भाईंदरमध्ये गुटख्याच्या गोदामातून ७ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 23:00 IST2021-04-17T22:59:28+5:302021-04-17T23:00:15+5:30
पोलिसांच्या धाडीत तेथे गोण्यां मध्ये भरलेला प्रतिबंधित ७ लाखांचा गुटखा सापडला . तेथील तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६० हजार रुपयांची रोकड सुद्धा जप्त केली आहे .

भाईंदरमध्ये गुटख्याच्या गोदामातून ७ लाखांचा गुटखा जप्त
मीरारोड - पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने भाईंदर मधील एका बेकायदा गुटखा साठा केलेल्या गोदामावर धाड टाकून ७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व ६० हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे .
भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट भागातील ईगल कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या सदनिकेत शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा मोठा साठा करून ठेवण्यात आला असून त्याची येथून तस्करी केली जात असल्याची माहिती मीरा भाईंदर विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन काशीद व पोलीस पथकाने सदनिकेवर धाड टाकली .
पोलिसांच्या धाडीत तेथे गोण्यां मध्ये भरलेला प्रतिबंधित ७ लाखांचा गुटखा सापडला . तेथील तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६० हजार रुपयांची रोकड सुद्धा जप्त केली आहे . पकडलेल्या आरोपींनी सांगितले कि , ते एकूण ६ भागीदार असून सदर सदनिका भाड्याने घेऊन गुटख्याचा भागीदारीत व्यवसाय करत होते . नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .