ग्रामीण भागातील ५९ विद्यार्थ्यांची इस्रोसाठी ‘मिशन भरारी’; शासनानं दिला ५० लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:01 IST2026-04-28T07:00:26+5:302026-04-28T07:01:03+5:30
या स्पर्धेतून निवड झालेले ५९ विद्यार्थी हे ‘सायन्स सोल्जर्स’ असून, भविष्यात देशाचे वैज्ञानिक म्हणून ते नेतृत्व करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

ग्रामीण भागातील ५९ विद्यार्थ्यांची इस्रोसाठी ‘मिशन भरारी’; शासनानं दिला ५० लाखांचा निधी
ठाणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ उपक्रमाला वेग देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी इस्रो अभ्यास दौऱ्यास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे हा कार्यक्रम झाला.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा रॉकेट लाँचिंग स्टेशन, केरळ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी म्युझियम, आदी ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल. तसेच तिरुअनंतपूरम व कन्याकुमारी येथील ऐतिहासिक स्थळांचाही अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधीही मिळाली आहे. यावेळी आ. किसन कथाेरेंसह, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, आदी उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ‘मिशन भरारी’ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक उपक्रम असल्याचे सांगत या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. अल्पावधीतच ५९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांचा अनुभव देऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले.
हे विद्यार्थी ‘सायन्स सोल्जर्स’
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे, यांनी ‘मिशन भरारी’ हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले. या स्पर्धेतून निवड झालेले ५९ विद्यार्थी हे ‘सायन्स सोल्जर्स’ असून, भविष्यात देशाचे वैज्ञानिक म्हणून ते नेतृत्व करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना जिज्ञासा व प्रश्न विचारण्याची सवय जोपासण्याचे आवाहन करीत शिंदे यांनी विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नसून शोध व विचारांची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.