भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट? नेटकरी झालेत अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:56 IST2026-01-05T10:56:00+5:302026-01-05T10:56:32+5:30
Zomato Deepinder Goyal Gadget

भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट? नेटकरी झालेत अवाक्
नवी दिल्ली: झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल हे नेहमीच त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर (कानफटीवर) एक छोटे पांढरे गोल गॅजेट दिसले आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. हे केवळ फॅशनसाठी लावलेले स्टिकर नसून, मेंदूचे सिग्नल वाचणारे एक अत्याधुनिक 'ब्रेन-मॉनिटरिंग डिव्हाइस' आहे.
काय आहे हे 'डोक्याबाहेरचे' मशीन?
सामान्य भाषेत सांगायचे तर, हे मेंदूचे सिग्नल वाचणारे एक सेन्सर आहे. आपला मेंदू दर सेकंदाला काही इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करत असतो. हे डिव्हाइस कोणत्याही इंजेक्शन किंवा शस्त्रक्रियेशिवाय केवळ त्वचेवर चिकटवले जाते आणि बाहेरूनच मेंदूच्या लहरी टॅप करते. हे तंत्रज्ञान पूर्णपणे 'नॉन-इनवेसिव्ह' आहे, म्हणजेच यामुळे मेंदूला कोणतीही इजा होत नाही.
किंमत आणि मुख्य वैशिष्ट्ये
या गॅजेटची किंमत बाजारात ७०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत असू शकते. याच्या माध्यमातून खालील गोष्टींचे मोजमाप केले जाते:
एकाग्रता (Focus): कामात तुम्ही किती लक्ष केंद्रित करत आहात.
तणाव पातळी (Stress Level): तुमचा मेंदू सध्या किती दबावाखाली आहे.
झोप आणि ध्यान (Meditation): तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि ध्यानादरम्यान मेंदूची स्थिती.
पॅरालाइज्ड रुग्णांसाठी वरदान?
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा भविष्यात आरोग्य क्षेत्रात होणार आहे. हे डिव्हाइस मेंदूचे सिग्नल मशीनला पाठवते. यामुळे पॅरालाइज्ड (अर्धांगवायू झालेल्या) व्यक्तींना न बोलता किंवा हात न हलवता केवळ विचारांच्या जोरावर स्क्रीन, गेम किंवा कोणतेही उपकरण नियंत्रित करता येईल. हे तंत्रज्ञान 'ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस' च्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
धोका आणि प्रायव्हसी
तज्ज्ञांच्या मते, हे डिव्हाइस मेंदूला कोणतेही सिग्नल पाठवत नाही, तर फक्त वाचते; त्यामुळे ते सुरक्षित मानले जाते. मात्र, 'डेटा प्रायव्हसी' हा मोठा प्रश्न आहे. जर तुमच्या विचारांचा आणि मेंदूचा डेटा चुकीच्या हातात गेला, तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.