फासे उलटे पडू लागले! इलॉन मस्क यांना आणखी एक झटका, १०० कर्मचाऱ्यांची नोटीस ठरतेय अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:33 IST2022-12-21T17:31:55+5:302022-12-21T17:33:51+5:30
इलॉन मस्कच्या अडचणी काही केल्या थांबताना दिसत नाहीत. ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क यांना एकामागून एक झटके बसत आहेत.

फासे उलटे पडू लागले! इलॉन मस्क यांना आणखी एक झटका, १०० कर्मचाऱ्यांची नोटीस ठरतेय अडचण
इलॉन मस्कच्या अडचणी काही केल्या थांबताना दिसत नाहीत. ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क यांना एकामागून एक झटके बसत आहेत. ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांकडून मस्क यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नुकतंच ट्विटरच्या १०० माजी कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर कायदेशीर बाबींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. याआधीही त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. यात हजारो कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढून टाकणे, लैंगिक भेदभावाखाली महिलांना कामावरुन काढून टाकणे किंवा कर्मचाऱ्यांचा पगार थांबवणे अशा तक्रारींचा समावेश आहे.
आता या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्का मस्क यांना बसला आहे. यात माजी कर्मचाऱ्यांनी मस्क यांच्याविरोधात खटला न्यायालयाऐवजी लवादात दाखल केला आहे. याआधीही वकील शॅनन लिस रियोर्डन यांनी ट्विटरच्या विरोधात लवादकडे १०० तक्रारी दाखल केल्या होत्या. ज्या कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात प्रलंबित आहेत.
शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वत:हून दिला राजीनामा
नोव्हेंबरच्या सुरुवातीस मस्क यांनी खर्च कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. तर इतर शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राजीनामे दिले होते. लवादामध्ये कर्मचार्यांनी ट्विटरवर आरोप केले. ज्यात लैंगिक भेदभावाला बळी पडलेल्या किंवा कराराचा भंग केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. याशिवाय जे लोक वैद्यकीय किंवा पालकत्वाच्या रजेवर गेले होते, त्यांनाही काढून टाकण्यात आलं होतं, या लोकांना ट्विटरने बेकायदेशीरपणे कमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.