मुंबई वन: एका ॲपवर मेट्रो, बस, मोनोरेलसह उपनगरी रेल्वे तिकिटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:58 IST2025-10-09T09:58:21+5:302025-10-09T09:58:49+5:30
Mumbai One App Update: ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे.

मुंबई वन: एका ॲपवर मेट्रो, बस, मोनोरेलसह उपनगरी रेल्वे तिकिटे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवेसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास वाचणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन’ हे देशातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी त्याचे अनावरण करण्यात आले. यातून एकाच क्यूआर कोडद्वारे विविध परिवहन सेवांमधून प्रवास करता येणार आहे. ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.
एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने पाऊल उचलत एक ॲप-अमर्याद प्रवास या घोषवाक्याखाली हे ॲप विकसित केले आहे. ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांत असून त्यातून प्रवाशांना भाषेची अडचण येणार नाही. ॲप दररोज १ ते १.५ लाख व्यवहार सुरळीतपणे हाताळू शकेल. तर सर्व्हर दररोज कमाल ५० लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai One ॲपचे फायदे
प्रवासासाठी वेगवेगळे बुकिंग आणि वेगवेगळी तिकिटे काढण्याच्या त्रासातून मुक्तता
तिकिटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही
कागदी तिकिटांचा वापर घटणार. पर्यावरणपूरक प्रवासाला चालना
शेअर माय लोकेशन आणि आपत्कालीन हेल्पलाइनसारखी प्रवासी सुरक्षेची फीचर्स त्यात आहेत. त्यातून प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल.
या सेवांचे तिकीट मिळणार एकाच ॲपवर
घाटकोपर वर्सोवा मेट्रो १, अंधेरी दहिसर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७, कफ परेड आरे मेट्रो ३, नवी मुंबई मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, टीएमटी, एमबीएमटी, केडीएमटी, एनएमएमटी या वाहतूक सेवांचे तिकीट या ॲपद्वारे काढता येणार आहे.
मुंबई वन ॲपमुळे
मार्गांची उपलब्धता, सेवा संदर्भातील रिअल-टाइम माहिती प्रवाशांना मिळेल. सर्व व्यवहार डिजिटल वॉलेट्स, प्रीपेड बॅलन्सद्वारे कॅशलेस होतील. ॲपसाठी अतिरिक्त शुल्क नसेल.
पर्यटनाला चालना
देशी व परदेशी पर्यटकांना शहरातील महत्त्वाची आकर्षणे, निवडक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक केंद्रांची माहिती ॲपवर उपलब्ध होईल.
तसेच मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळांची विस्तृत माहिती समाविष्ट आहे. मॉल, पेट्रोल पंप अशा उपयुक्त ठिकाणांचा नकाशावर आधारित तपशील देण्यात आला आहे.