रिलायन्स जिओने काही वर्षांपूर्वी लोकांना फुकट इंटरनेट देऊन इतकी सवय लावली की आता ती सुटता सुटत नाहीय. शंभर-सव्वाशे रुपयांत जिओ तेव्हा फोरजी इंटरनेट देत होते. परंतू, दोन वर्षांपूर्वी जिओने हळूहळून ही रक्कम १९९, २४९ केली आणि आता तर ती २९९ रुपयांवर नेऊन ठेवली आहे. आता जिओचे २८ दिवसांचे रिचार्ज करायचे असेल तर तुम्हाला २९९ चे रिचार्ज करावे लागणार आहे.
जिओने सर्वात स्वस्त १ जीबी डेटा असलेले प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. २०९ रुपयांत २२ दिवस आणि २४९ रुपयांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. आता हे दोन्ही प्लॅन बंद करण्यात आले असून यापुढे २९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळणार आहे.
जिओने प्रत्येकी युजरमागचा सरासरी महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक युजर ही सरासरी रक्कम जिओला देत असतो. यापूर्वी व्होडाफोन, एअरटेलने हे स्वस्त प्लॅन बंद केले आहेत. सध्या जिओचा एआरपीयू २०९ रुपये आहे.
जिओ युजर असाल तर मग आता पर्याय काय...२९९ रुपये खर्च करायचे नसतील तर जिओ युजरना २३९ रुपयांचा प्लॅन आहे, त्यात २२ दिवसांची व्हॅलिडीटी आणि १.५ जीबी दैनिक डेटा, अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे. १८९ रुपयांचा एक प्लॅन आहे, ज्यात तुम्हाला महिन्याला एकूण २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, २८ दिवसांच्या वैधतेसह ३०० एसएमएस मिळणार आहेत. १९८ रुपयांचा प्लॅन १४ दिवसांची वैधता देणार आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे.