X वरील क्रिएटर्सना YouTube पेक्षा जास्त पैसे मिळणार; Elon Musk यांचे संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:11 IST2026-01-02T14:07:15+5:302026-01-02T14:11:17+5:30
Elon Musk X: इलॉन मस्क यांची थेट YouTube ला टक्कर देण्याची तयारी!

X वरील क्रिएटर्सना YouTube पेक्षा जास्त पैसे मिळणार; Elon Musk यांचे संकेत, म्हणाले...
Elon Musk X: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X बाबत Elon Musk यांनी पुन्हा एकदा मोठे संकेत दिले आहेत. X वरील कंटेंट क्रिएटर्सना सध्या कमी मोबदला मिळत असल्याची कबुली याआधीच दिल्यानंतर, आता Musk यांनी क्रिएटर्सची कमाई वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामागचा उद्देश X ला थेट YouTube सारख्या दिग्गज प्लॅटफॉर्मशी स्पर्धेा करणे हा आहे.
क्रिएटर्सची कमाई वाढवण्यावर X मध्ये सहमती
एका युजरने X वर क्रिएटर्सना अधिक मोबदला देण्याची मागणी केल्यानंतर, Elon Musk यांनी X चे हेड ऑफ प्रॉडक्ट Nikita Bier यांना टॅग करत प्रतिक्रिया दिली. या दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे Musk यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी सिस्टिमचा गैरवापर होणार नाही, यासाठी कडक उपाययोजनांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Ok, let’s do it, but rigorously enforcing no gaming of the system @nikitabier
— Elon Musk (@elonmusk) December 30, 2025
यावर Nikita Bier यांनी त्वरित उत्तर देत सांगितले की, टीम या विषयावर काम करत आहे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बहुतांश फसवणूक व बनावट एंगेजमेंट रोखता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
YouTube पेक्षा जास्त कमाईच्या अपेक्षेने उत्साह
Musk यांच्या या विधानानंतर अनेक क्रिएटर्स आणि युजर्सनी याला मोठा बदल असल्याचे म्हटले आहे. स्वतंत्र पत्रकार Nick Shirley यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आतापर्यंत X ला YouTube च्या अॅडसेंस मॉडेलशी स्पर्धा करता आलेली नाही. मात्र, सेन्सॉरशिपशिवाय मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यात X अधिक प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य मोबदला न मिळाल्यामुळे अनेक क्रिएटर्स X कडे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र, जर कमाईत वाढ झाली तर ही मानसिकता बदलू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
AI कंटेंटच्या युगात ‘खऱ्या’ क्रिएटर्सवर भर
चर्चेदरम्यान अनेक युजर्सनी असे मत व्यक्त केले की, भविष्यात तेच डिजिटल प्लॅटफॉर्म टिकतील जे क्रिएटर्सना योग्य आणि पारदर्शक मोबदला देतील. इंटरनेटवर AI-निर्मित कंटेंट झपाट्याने वाढत असताना, विश्वासार्ह आणि मानवी कंटेंटचे महत्त्व अधिक वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर Musk यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स खरा आणि विश्वासार्ह कंटेंट टिकवून ठेवण्यासाठी झगडत आहेत.
याआधीही मान्य केली होती कमतरता
ही पहिली वेळ नाही की Musk यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी स्वतः कबूल केले होते की X सध्या क्रिएटर्सना पुरेसा आणि नियमित मोबदला देऊ शकत नाही. त्या वेळी त्यांनी YouTube या बाबतीत अधिक सक्षम असल्याचेही मान्य केले होते. Musk यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला X चा क्रिएटर मोनेटायझेशन प्रोग्राम जाहिरातींमधून होणाऱ्या कमाईचा काही हिस्सा देतो. मात्र, अनियमित पेमेंट, उशीर आणि अस्पष्ट नियमांमुळे या योजनेवर टीकाही झाली आहे.
कडक नियंत्रण आणि पारदर्शकतेचे आश्वासन
Musk यांच्या ताज्या विधानातून हे स्पष्ट होते की X केवळ क्रिएटर्सची कमाई वाढवण्यावरच भर देणार नाही, तर बनावट एंगेजमेंट, बॉट्स आणि फसवणुकीद्वारे सिस्टिमचा गैरवापर करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार आहे. ही योजना प्रभावीपणे अंमलात आली, तर X खरोखरच YouTube साठी मोठे आव्हान ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.