पहिल्यांदा या शहरात BSNL 5G येणार...! एआय समिटमध्ये मोठी घोषणा, 'सॉफ्ट लाँच'ची तयारी, जाणून घ्या तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:54 IST2026-02-19T12:53:32+5:302026-02-19T12:54:04+5:30
BSNL 5G Launch: बीएसएनएल युजर्सची प्रतीक्षा संपली! दिल्लीत पुढील ६ महिन्यांत ५जी चे सॉफ्ट लाँच होणार. वाचा स्वदेशी ५जी नेटवर्क आणि लाँचिंगबद्दलची सविस्तर माहिती.

पहिल्यांदा या शहरात BSNL 5G येणार...! एआय समिटमध्ये मोठी घोषणा, 'सॉफ्ट लाँच'ची तयारी, जाणून घ्या तारीख
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडच्या कोट्यवधी युजर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खासगी कंपन्यांच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेले ग्राहक बऱ्याच काळापासून बीएसएनएलच्या ५जी सेवेची वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपणार असून, कंपनीने ५जी लाँचिंगचा निश्चित रोडमॅप जाहीर केला आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी दिल्लीतील एआय समिटमध्ये माहिती दिली की, पुढील सहा महिन्यांत बीएसएनएलची ५जी सेवा 'सॉफ्ट लाँच' केली जाईल.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बीएसएनएल आपल्या ५जी सेवेची पहिली चाचणी आणि सुरुवात देशाची राजधानी दिल्ली येथून करणार आहे. सध्या कंपनी आपल्या विद्यमान ४जी इन्फ्रास्ट्रक्चरला ५जी मध्ये अपग्रेड करण्यावर भर देत आहे. "आम्ही ५जी सेवा लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि दिल्लीत याचे सॉफ्ट लाँचिंग केले जाईल," असे रॉबर्ट रवी यांनी स्पष्ट केले.
बीएसएनएलचे ५जी नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तेजस नेटवर्क्स आणि सी-डॉट यांच्याशी करार केला आहे. सध्या देशभरात १ लाखाहून अधिक ४जी टॉवर्स लावण्यात आले असून, हे सर्व टॉवर्स '५जी रेडी' आहेत. म्हणजेच सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे हे टॉवर्स लगेच ५जी सिग्नल देण्यास सक्षम होतील.
खासगी कंपन्यांना तगडी टक्कर
जिओ आणि एअरटेल यांनी गेल्या वर्षी आपले रिचार्ज प्लॅन्स महाग केल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले आहेत. आता स्वस्त दरात ५जी सेवा देऊन बीएसएनएल आपली पकड पुन्हा एकदा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये यशस्वी लाँचिंगनंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात विस्तारली जाईल.