सावधान...स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने होतेय हेरगिरी !

By शेखर पाटील | Published: January 4, 2018 06:44 PM2018-01-04T18:44:23+5:302018-01-04T18:45:16+5:30

काही गेमिंग अ‍ॅप्स हे स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.

Beware ... smartphones spying on the microphone! | सावधान...स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने होतेय हेरगिरी !

सावधान...स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने होतेय हेरगिरी !

Next

काही गेमिंग अ‍ॅप्स हे स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.

लॅपटॉपमधील वेबकॅम तसेच स्मार्टफोनमधील कॅमेरे व मायक्रोफोनच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळवणे शक्य असल्याचे आधीच सिध्द करण्यात आले आहे. यातच आता मायक्रोफोनचा एक गैरवापर समोर आला आहे. या संदर्भात न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्तांत (https://www.nytimes.com/2017/12/28/business/media/alphonso-app-tracking.html) प्रकाशित केला आहे. यानुसार अनेक गेमींग अ‍ॅप्स हे युजरच्या स्मार्टफोनमध्ये असणार्‍या मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जमा करतात. विशेष करून संबंधीत गेमर्स त्याच्या टिव्हीवर नेमके काय पाहतोय? याची माहिती याद्वारे जमा करण्यात येते. हा डाटा जाहिरातदारांना विकण्यात येतो. यामुळे संबंधीत युजरला त्याच्या टिव्हीवरील कार्यक्रम आणि एकंदरीतच आवडी-निवडीशी संबंधीत जाहिरातींचा भडिमार करणे शक्य होत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. यासाठी संबंधीत अ‍ॅप्स हे अल्फोन्सो या स्टार्टपने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करत असल्याचे आढळून आले आहे. हे सॉफ्टवेअर गुगल प्ले स्टोअरवर असणार्‍या जवळपास २५० पेक्षा जास्त अ‍ॅप्समध्ये वापरले जात आहे.

कोणताही गेम आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करत असतांना आपल्याला विविध प्रकारच्या परमीशन्स मागण्यात येत असतात. अल्फोन्सोच्या सॉफ्टवेअरने युक्त असणारे गेमिंग अ‍ॅप युजरला त्याच्या स्मार्टफोनचा अ‍ॅक्सेस मागतात. बहुतांश युजर याला घाईत परवानगी देतात. यातून स्मार्टफोनमध्ये असणार्‍या मायक्रोफोनचे नियंत्रण संबंधीत अ‍ॅपकडे जाते. आणि अर्थातच अल्फोन्सोच्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून ते युजरच्या भोवतालात असणार्‍या ध्वनींवर हेरगिरी करत ही माहिती कंपन्यांना विकतात. याच पध्दतीने युजरच्या वैयक्तीक आयुष्यातील सर्व माहिती त्या अ‍ॅपकडे जमा होत असल्याची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. अल्फोन्सोचे सीईओ नवीन चोरडिया यांनी आपले सॉफ्टवेअर हे फक्त परिसरातील ऑडिओ सिग्नल रेकॉर्ड करत असल्याचा दावा केला. कोणत्याही मानवी ध्वनींचे रेकॉर्डींग होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. अर्थात युजर्सच्या वैयक्तीक आवडी-निवडीची माहिती कंपन्यांकडे जाणे गैर आहेच.

(छायाचित्र सौजन्य : न्यूयॉर्क टाईम्स)

Web Title: Beware ... smartphones spying on the microphone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल