शेअर मार्केट घोटाळ्यातील विशाल फटे सोलापूर पोलिसात हजर, चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:40 PM2022-01-17T20:40:32+5:302022-01-17T20:51:10+5:30

विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांत हजर झाला असून पोलीस अधिक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडत असल्याचे समजते. पोलिसांकडूनही त्याची चौकशी करण्यात येत आहे.

Vishal Phate in stock market scam appears in Solapur gramin police, investigation continues | शेअर मार्केट घोटाळ्यातील विशाल फटे सोलापूर पोलिसात हजर, चौकशी सुरू

शेअर मार्केट घोटाळ्यातील विशाल फटे सोलापूर पोलिसात हजर, चौकशी सुरू

googlenewsNext

सोलापूर - जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ज्या नावाची चर्चा आहे, तो शेअर मार्केट घोटाळ्यातील आरोपी विशाल फटे याने युट्युबद्वारे आपली बाजू मांडली. मी आज संध्याकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असून पोलिसांनीही माझा शोध घेण्यासाठी धावपळ करण्याची गरज नसल्याचे विशालने व्हिडिओच्या माध्यमातून सांगतिले होते. त्यानंतर, आज संध्याकाळी तो सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात हजर झाला आहे. 

विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांत हजर झाला असून पोलीस अधीक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडत आहे. पोलिसांकडूनही त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार, विशालने पत्नी आणि त्याच्या मुलीला नातेवाईकांकडे ठेवले आहे. दरम्यान, अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल. उद्या मंगळवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पत्नीला अटक करण्याची गरज नसल्याचं पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी म्हटलंय. 

दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या शेअर्स घोटाळाप्रकरणी सध्या गायब असलेला विशाल फटे अखेर सोमवारी दुपारी लोकांच्या मोबाईलवर प्रकटला. म्हणजे चक्क यूट्यूबवर.. त्यानं अर्धा तासाचा आपला व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, तो आता पोलिसांपुढे शरण आला आहे. 

व्हिडिओत काय म्हणतो फटे

या व्हिडिओत विशाल फटे म्हणतोय की मला पळूनच जायचं असतं तर मी माझ्या बार्शीतील बँक खात्यामध्ये दोन कोटी रुपये ठेवून गेलोच नसतो. मी आजपर्यंत अनेकांना भरभरून पैसे दिले आहेत. ज्यांच्या पत्नीच्या गळ्यात साधा मणीही नव्हता, हीच मंडळी आता अनेक तोळ्यांचे दागिने घालून फिरताहेत. ज्यांना महिन्याला 8-9 टक्के अधिक फायदा करून दिला, ती मंडळीसुद्धा माझ्या विरोधात तक्रार करत आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटते. यात माझ्या आई-वडिलांचा अन् भावाचा काही संबंध नाही.

दरम्यान, माझ्याकडे 200 कोटी रुपये असल्याच्या बातम्या झळकल्या पण मी एवढे पैसै घेतले नाहीत. अधिकाधिक 30 ते 40 कोटी रुपयांचा आकडा असू शकतो, असेही विशालने स्पष्ट केले आहेत. तसेच, मी अनेकांना 6 महिन्यात पैस डबल कमावूनही दिल्याचे त्याने म्हटले. 
 

Web Title: Vishal Phate in stock market scam appears in Solapur gramin police, investigation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.