काही दिवसापूर्वी तुळजापुरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता बार्शीमध्ये ड्रग्ज सापडल्याचे समोर आले आहे. बार्शी शहर पोलिसांनी बार्शी-परांडा रोडवरील स्वराज हॉटेलच्या बाजूस शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून त्यात अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यात कारसह १३ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत बार्शी शहर पोलिसांनी आरोपीकडून जागेवरच १० लाखांच्या कारसह २ लाखांचे २० ग्रॅम मेफेड्रॉन अमली पदार्थ (एम.डी.),एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, रोख ८ हजार आणि तीन मोबाइल असा १३ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
याप्रकरणी असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख याच्यावर एन.डी.पी.एस. कलम ८ क, २२ ब, २९ व भारतीय शस्त्र अधि. १९५९ नुसार व महाराष्ट्र पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अटक केलेल्या आरोपींना तपासी अधिकारी पो.स.ई. अभय माकणे यांनी बार्शी न्यायालयाचे न्या. एच.यू. पाटील यांच्या समोर उभे करताच आरोपींना ५ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.या दरम्यान चौकशी करुन या प्रकरणाचा राज्यातील इतर प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपासणी केली जाणार आहे.