उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:53 IST2025-11-26T18:42:28+5:302025-11-26T18:53:16+5:30
अनगर नगर पंचायतची निवडणूक राज्यभरात गाजली. ही निवडणूक बिनविरोध झाली.

उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आता थिटे यांना मोठा झटका बसला आहे. थिटे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत. न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्वला थिटे यांची अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला.
उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. पण, जर सही खोडली असा तुमचा आरोप असेल तर उमेदवाराने पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून अनगर नगरपालिकेवरील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर कोर्टाची टांगती तलवार होती. आता त्यांची निवड बिनविरोधी विजयी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
आज जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या कोर्टासमोर उज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्यावतीने तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले. ४ तास युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशनी याप्रकरणी निकाल दिला.