सोलापूर महापूर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन IAS अधिकारी घरोघरी, जाणून घेत आहेत अडचणी
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 28, 2025 18:40 IST2025-09-28T18:39:06+5:302025-09-28T18:40:27+5:30
एवढेच नव्हे तर तातडीची आर्थिक मदत देण्याचेही काम दोन IAS अधिकारी वेगाने करीत आहेत.

सोलापूर महापूर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन IAS अधिकारी घरोघरी, जाणून घेत आहेत अडचणी
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात महापुराने चांगलेच थैमान घातले आहे. शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. महापुराने भयभीत झालेल्या व मदतीच्या आशेने बसलेल्या नागरिकांच्या मदतीला आता सोलापुरातील दोन IAS अधिकारी धावून जात आहेत. प्रत्येक पूरग्रस्तांच्या घरोघरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. एवढेच नव्हे तर तातडीची आर्थिक मदत देण्याचेही काम दोन IAS अधिकारी वेगाने करीत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना व भीमा नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे जिल्ह्यातील १२९ गावांना पाण्याने वेढा घातला आहे. पुरात अडकलेल्या आत्तापर्यंत पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. आता महापूर हळूहळू ओसरू लागला असतानाच प्रशासनाने आता मदतीसाठी मोठी धाव घेतली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह महसूल, जिल्हा परिषदेसह अन्य विभागाचे अधिकारी गावोगावी फिरत पूरग्रस्तांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. या सगळ्या घडामोडीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत ते जिल्ह्याचे दोन आयएएस अधिकारी. पूरग्रस्तांच्या घरी जाऊन, साधेपणाने घरात बसून लोकांच्या अडीअडचणी, हवी असलेली मदत जाणून घेत आहेत.
रविवारी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे पूरग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन तेथील महिलांची शासकीय मदतीचे अनुषंगाने चौकशी केली तसेच त्यांना धीर दिला व तहसीलदार सचिन मुळे यांना घरात पाणी शिरणे व अन्नधान्याचे नुकसान होणे या अनुषंगाने तातडीची दहा हजाराची मदत तात्काळ सर्वांच्या अकाउंटवर जमा करण्याबाबत या दोन अधिकाऱ्यांनी सुचित केले.