MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:48 IST2025-10-08T14:32:15+5:302025-10-08T14:48:31+5:30
सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली.

MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम
Solapur: सोलापूरात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. २५ वर्षीय साक्षी सुरेश मैलापुरे हिने अज्ञात कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षीने राहत्या घरातील छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. ही घटना जुळे सोलापूर येथील आयएमएस शाळेसमोर मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीला तिच्या आईने पाहिले. साक्षीला नातेवाइकांच्या साहाय्याने फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. साक्षी सोलापुरातील वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकण्यास होती. या घटनेची माहिती कळताच अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, उपअधिष्ठाता डॉ. नरेश जंजाळ यांनी आई-वडिलांची भेट घेत विचारपूस केली. तिचे वडील वीज वितरण विभागात कार्यरत आहेत. तिच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
साक्षीला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर रडतरडतच तिला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिला डॉक्टरांनी मृत घोषित करताच साक्षीची आई ही खाली कोसळली. जमिनीवरच कोसळल्याने तिच्या आईच्या डोक्यात खोच पडली. यामुळे ती रक्तबंबाळ झाली. तिला आपल्या डोक्यातून रक्त येत असल्याची जाणच नव्हती. ती फक्त साक्षी.. साक्षी.. म्हणून रडत होती. डॉक्टरांनी समजूत घालून उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले. तेव्हाही त्यांना रडू आवरत नव्हते.
साक्षी ही मंगळवारी सकाळी अभ्यास करण्यासाठी खोलीत गेली होती. बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने तिच्या आईने खोलीचा दरवाजा ठोठवला. पण आतून प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे साक्षीच्या आईने तिच्या मोबाईलवर फोन केला मात्र तोही उचलला गेला नाही. संशय आल्याने आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा साक्षीला पाहून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकरली.