संशयाचा क्रूर शेवट! विभक्त राहत असलेल्या पतीने पत्नीची केली निर्घृण हत्या; मुलगी कॉलेजला जाताच घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:58 IST2025-10-15T17:56:58+5:302025-10-15T17:58:46+5:30
सोलापुरात पत्नीची हत्या करुन आरोपी पती पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

संशयाचा क्रूर शेवट! विभक्त राहत असलेल्या पतीने पत्नीची केली निर्घृण हत्या; मुलगी कॉलेजला जाताच घडला प्रकार
Solapur : सोलापुरात पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विभक्त राहणाऱ्या पतीने संशयावरून पत्नी यशोदा सुहास सिद्धगणेश (वय ३५) या महिलेचा चाकूने भोसकून खून केला. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास न्यू बुधवार पेठ येथील रमाबाई आंबेडकरनगरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पती सुहास याला पोलिसांनी अटक केली. महत्त्वाचे म्हणजे पत्नीला भोसकल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
या प्रकरणी अन्नपूर्णा निलकंठ बाळशंकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुहासवर गुन्हा दाखल झाला. सकाळच्या सुमारास मृत यशोदा यांचा ओरडण्याचा आवाज आला. यामुळे अन्नपूर्णा यांनी घरात जाऊन पाहिले असताना यशोदा ही बेडजवळ खाली पडली होती. हे पाहून अन्नपूर्णा यांनी आरडाओरड केला. त्यावेळी आमच्यामध्ये 'कोणी आले, तर मी सर्वाना खल्लास करून टाकीन,' अशी धमकी देऊन आरोपी सुहास निघून गेला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल आले.
आरोपी सुहास निघून गेल्यावर यशोदा यांना शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत रिक्षातून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात त्यांच्या हातावर, गळ्यावर व पोटावर वार झाल्याने रक्तस्राव होत होता. यातूनच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच, नातेवाइकांची मोठी गर्दी हॉस्पिटल परिसरात झाली होती.
मृत यशोदा यांची मुलगी सौंदर्या ही कॉलेजला जाते. ती नेहमीप्रमाणे कॉलेजला तयार होऊन जात होती. तेव्हा यशोदा यांनी मी आराम करते, बाहेरून कडी लावून जा, असे सांगितले. यामुळे सौंदर्या ही कडी लावून कॉलेजला गेली. त्यानंतर, ही घटना घडली, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
दरम्यान, मृत यशोदा आणि आरोपी सुहास यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. नेहमीच्या वादाला कंटाळून त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. ते मागील चार ते पाच महिन्यांपासून विभक्त राहत होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. आरोपी सुहासला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.