जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा; पायी चालत जात मंदिर गाठलं, विठ्ठलाचं दर्शन करून केली पाहणी
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 27, 2026 16:04 IST2026-04-27T16:03:43+5:302026-04-27T16:04:12+5:30
कार्तिकीयेन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा; पायी चालत जात मंदिर गाठलं, विठ्ठलाचं दर्शन करून केली पाहणी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आज मोहिनी एकादशी. एकादशीनिमित्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात भाविकांची संख्या वाढली आहे. अशातच आषाढी वारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी चौफाळा परिसरात आपले शासकीय वाहन लावून पायी चालत विठ्ठलाचं मंदिर गाठलं. त्यानंतर मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे आदी उपस्थित होते. दरम्यान, कार्तिकीयेन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन संबधितांना आवश्यक सुचना दिल्या. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे १७ मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पायी चालत निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध भागातून आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला. संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांंनी मंदिर परिसरातील अडचणी, समस्या जाणून घेतल्या.