सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:31 IST2025-08-22T20:29:41+5:302025-08-22T20:31:33+5:30
पुण्यातील वैष्णवी हगवणे घटनेची आठवण करून देणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. काजल मिस्कीन या विवाहितेने छळ असह्य झाल्याने मृत्यूला कवटाळले.

सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
Solapur Crime: ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण पत्नीला म्हणत चाबकाने मारहाण करून तिचा छळ केला. या जाचाला कंटाळून काजल काजल मिस्कीन नारायण मिस्कीन (वय २५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील दहिवली गावात घडली. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सासरी काजलला खूप त्रास देण्यात येत होता. तिला उपाशी पोटी ठेवत होते. तिला कोणाशीही बोलू देत नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली. यामुळे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काजलच्या माहेरच्या मंडळींनी केली.
याप्रकरणी गुरुवारी रात्री पती नारायण विलास मिस्किन, विलास रामचंद्र मिस्किन, शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, माढा) यांच्यावर टेंभूर्णी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुरुवारी सकाळी काजलने आत्महत्या केल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली असता फौजदार अजित मोरे, संतोष पाटेकर हे आदी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह टेंभुर्णीच्या आरोग्य केंद्रात दाखल केल असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापुरातील सिव्हिलमध्ये आणला.
दोन महिन्यांपूर्वीच गेली होती सासरी
काजलचा नारायणसोबत ११ जुलै २०१९ मध्ये विवाह झाला होता. सासरच्या मंडळींकडून पैशासाठी त्रास होत असल्याने २०२४ मध्ये तिने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ती जवळपास एक वर्ष माहेरी राहण्यासाठी गेली होती.
त्यानंतर तिच्या पतीने तिचा छळ करणार नाही, चांगले नांदविणार, कोणताही त्रास देणार नाही, असे कोर्टात लिहून दिले होते. यानंतर ती जून महिन्यातच पुन्हा सासरी गेली होती. त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता, असा आरोपी तिच्या माहेरच्या मंडळींनी केला.
काजलच्या शरीरावर मारहाणीचे व्रण
काजलला गार पाण्यानेच अंघोळ करण्यास भाग पाडायचे. माहेरच्या नातेवाइकांशी बोलू दिले जात नव्हते. मोबाइलवरून आई-वडिलांना सासरी व्यवस्थित असल्याचे सांगायला भाग पाडत असे.
रक्षाबंधनासाठी तिला माहेरी पाठविण्यात आले नव्हते, असा आरोप केला. घटनेनंतर काजलच्या गळ्यावर आणि सर्वांगावर मारहाणीच्या खुणा असल्याचा आरोपही यावेळी नातेवाइकांनी केला. तिच्या पश्चात चार वर्षांची एक मुलगी असल्याची माहिती मयत काजलचे नातेवाईक रूपाली रणदिवे यांनी लोकमतला दिली.