धक्कादायक; पोहोयला शिकविणाऱ्या मातेचा मुलांदेखत बुडून दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 17:30 IST2022-03-07T17:30:09+5:302022-03-07T17:30:15+5:30

सांगोला : मुलांना विहिरीत पोहायला शिकवत असताना अचानक तोल गेल्याने आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विद्या रमेश पवार (२८, ...

Shocking; Mother who taught swimming drowned in front of her children | धक्कादायक; पोहोयला शिकविणाऱ्या मातेचा मुलांदेखत बुडून दुदैवी मृत्यू

धक्कादायक; पोहोयला शिकविणाऱ्या मातेचा मुलांदेखत बुडून दुदैवी मृत्यू

सांगोला : मुलांना विहिरीत पोहायला शिकवत असताना अचानक तोल गेल्याने आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विद्या रमेश पवार (२८, रा. हातीद, ता. सांगोला) असे मृत विवाहितेचे नाव असून रविवारी सकाळी ९.३०च्या सुमारास सांगोला तालुक्यात हतीद येथे ही घटना घडली.

याबाबत सुप्रिया धनाजी पवार (रा. अलराइन नगर, सांगोला) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. दरम्यान, मातेच्या मृत्यूनंतर स्वरूप आणि स्वराज्य ही दोन मुले पोरकी झाली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्या पवार ही विवाहिता रविवारी सकाळी शेतात ज्वारीची मोडणी करण्याकरिता गेली होती. सोबत ती स्वरूप व स्वराज्य या दोन मुलांना घेऊन गेली होती. शेजारील अमोल पवार यांच्या विहिरीत मुलांना पोहायला शिकवीत असताना अचानक तिचा पाण्यात तोल गेला. पाण्यात पडल्यानंतर ती बुडू लागली. दोन्ही मुले आरडाओरड करू लागली. सासरे गोरख पवार आणि आजूबाजूचे लोक विहिरीवर जमा झाले; मात्र विहिरीत पाणी भरपूर प्रमाणात असल्याने इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने ते कमी करून तिला बाहेर काढले. तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

 

Web Title: Shocking; Mother who taught swimming drowned in front of her children