Shirish Valsangkar News Update: सोलापूरमधील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या मनीषा माने-मुसळे हिने तिच्याविरुद्ध नव्याने आर्थिक अपहाराची तक्रार आल्यानंतर, सदर बझार पोलिसांकडे या प्रकरणात डॉ. वळसंगकर हॉस्पिटलसह डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. उमा, डॉ. शोनाली यांच्या तीन वर्षाच्या बँक खात्यांची स्वतंत्र ऑडिटर नेमून चौकशी व्हावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या अर्जाद्वारे तिने म्हटले आहे की, माझ्या बँक खात्याची किंवा आर्थिक पत्र व्यवहारांची सखोल तपासणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे. वळसंगकर हॉस्पिटलच्या बँक खात्याची तसेच डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. उमा, डॉ. शोनाली यांच्या बँक खात्यांची कोणतीही चौकशी झाल्याचे दोषारोपपत्रात दिसून येत नाही.
वस्तुस्थिती समोर येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये हिशेबासाठी वापरले जाणारे लाइफ लाइन मनोरमा या सॉफ्टवेअर,दैनंदिन आय.पी.डी फाइल्स, वळसंगकर हॉस्पिटलचे बँक खाते, नमूद चारही डॉक्टरांचे तीन वर्षाच्या बँक खात्याची एकत्रित स्वतंत्र ऑडिटरमार्फत ऑडिट करावी. यातून मी आर्थिक अपहार केला अथवा नाही, हे स्पष्ट होईल. हे दुसरे पत्र १६ जुलै रोजी पोलिसांना दिले आहे.
पोलिस कोठडीत अन्अकाउंट रकमेची चौकशी
मनीषाने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणी मला १९ एप्रिल रोजी अटक झाली होती. न्यायालयाने मला अनुक्रमे पाच, तीन आणि दोन अशी १० दिवस पोलिस कोठडी सुनावली होती.
या काळात माझे खात्यामधील अनअकाउंट रकमेबद्दल पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर १५ मे २०२५ रोजी तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. नमूद हॉस्पिटल व डॉक्टरांच्या बँक खात्याची झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असे मनीषाचे म्हणणे आहे.
सेवामुक्तीच्या पत्रात अपहाराचा ठपका नाही
मनीषा मानेविरुद्ध गुन्हा नोंदल्यानंतर डॉ. वळसंगकर यांनी २९ एप्रिलच्या पत्रानुसार तिच्या घरच्या पत्त्यावर सेवासमाप्ती करण्याचे पत्र पाठवण्यात आले. त्यामध्ये 'तुमच्याविरुद्ध कुठलेही आरोप न करता व कुठलाही ठपका न ठेवता तुमची प्रशासकीय अधिकारी ही सेवा १ मे २०२५ पासून समाप्त करण्यात येत आहे,' असे डॉ. उमा वळसंगकरांच्या सहीनिशी पत्र दिले आहे.
नमूद वस्तुस्थिती असताना माझा जामीन अर्ज झाल्यावर सूडबुद्धीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. मी कोणताही अपहार केलेला नाही. माझ्याविरुद्ध काही तक्रार आल्यास मी चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे मनीषाने ९ जुलैला दिलेल्या पत्रातही म्हटले आहे.