"भाजपचे वागणे अबलेवर अत्याचार केल्यासारखे"; सांगोल्यात शेकापशी युती केल्याने शहाजीबापू संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:09 IST2025-11-19T15:45:48+5:302025-11-19T16:09:30+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त असल्याची टीका शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.

"भाजपचे वागणे अबलेवर अत्याचार केल्यासारखे"; सांगोल्यात शेकापशी युती केल्याने शहाजीबापू संतापले
Shahaji Bapu Patil: भाजपची शेकापशी युती म्हणजे दहशतवाद, एखाद्या आबलेवर केलेला अत्याचार असावा अशा पद्धतीने भाजपचे वागणे मला दिसून आले आहे. भाजपची अशी जर राजनीती होणार असेल तर ही युती म्हणजे हिडीस, किळसवाणी वागणूक असून, या वैभवशाली महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.
आमदार राज्यात भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असताना सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत माजी शहाजीबापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने महायुतीचा धर्म न पाळता शेकापबरोबर युती केल्यामुळे शहाजी बापू चांगलेच संतापले आहेत. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती, आघाडीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये बैठका चर्चा सुरू होती, मात्र नगराध्यक्ष पदावर एकमत न झाल्यामुळे युती फिस्कटली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपने मोठी खेळी केली. शेकापचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मारुती बनकर यांचा भाजपत प्रवेश देऊन मोठा डाव साधला. बनकर आबांच्या अनपेक्षित पक्षप्रवेशानंतर शेकापला धक्का बसला तरीही शेकापच्या नेतृत्वाने सारवासारव करीत विकासाच्या दृष्टीने एक पाऊल मागे घेत भाजपशी हात मिळवणी केल्याचे माध्यमासमोर स्पष्ट केले.
नगराध्यक्ष पदामुळे चर्चा फिसकटली
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी सातत्याने चर्चा, बैठकीच्या फेऱ्या झाल्या तसे शेवटपर्यंत प्रयत्नही केले. परंतु दोन्हीकडून नगराध्यक्ष पदासाठी अट्टाहास होता. तरीही मी स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे, वरिष्ठ नेत्यांकडे युतीबाबत संपर्कात होतो. प्रदेश स्तरावरूनही नगराध्यक्षपदाची निवडणूक 'कमळ' चिन्हावरच लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेबरोबर युती फिस्कटल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी सांगितले.