‘आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!’ म्हणणारा सलमान टेन्शन देऊन गेला; अहिल, आहाब मदरशात गेले म्हणून वाचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:21 IST2025-05-19T15:20:58+5:302025-05-19T15:21:20+5:30
१५ दिवसांपूर्वी त्यांनी आपली दोन मुले अहिल (वय १३), आहाब ( वय १०) यांना शिक्षणासाठी मदरशात पाठविले. त्यामुळे ते दोघे या आगीच्या दुर्घटनेतून बचावले.

‘आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!’ म्हणणारा सलमान टेन्शन देऊन गेला; अहिल, आहाब मदरशात गेले म्हणून वाचले...
सोलापूर : अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’तील टेक्सटाइल कारखान्याला आग लागून बागवान कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला. कुटुंबप्रमुख महताब बागवान यांची मुलगी हिना शेख या आपल्या आई-वडिलांसह राहायच्या. १५ दिवसांपूर्वी त्यांनी आपली दोन मुले अहिल (वय १३), आहाब ( वय १०) यांना शिक्षणासाठी मदरशात पाठविले. त्यामुळे ते दोघे या आगीच्या दुर्घटनेतून बचावले.
आधी मोलमजुरी, नंतर कारखान्यात काम
बागवान कुटुंबीय हे मार्केट यार्डजवळील सर्वोदयनगर येथे राहत होते. कुटुंबप्रमुख महताब बागावान हे मोलमजुरी करून ते घराचा गाडा ओढायचे. मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी घराला हातभार लावला. पुढे अक्कलकोट रोड येथील टेक्सटाइल कारखान्यात काम करण्याचा निर्णय घेतला. मालकाने त्यांना कारखान्यामधील घरात राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीय टॉवेल घडी घालणे, पॅक करणे आदी काम करू लागले.
घरातील लाडका अन् कुटुंबाचा आधार गेला
‘आपा, टेन्शन मत ले, में हूँ ना!’ म्हणणारा सलमान कायमचे टेन्शन देऊन गेला. सलमान हा घरातील लाडका होता.
आई-वडिलांसह बहीणही त्याचे लाड करायची. कोणतेही काम असले की सलमान मदतीसाठी तत्पर असायचा.
बहीण तस्लिमला तर सलमानचा मोठा आधार होता. काही काम असले तर आपा, टेन्शन मत ले मैं हूँ ना ! असे म्हणत आधार द्यायचा.
सिव्हिलच्या भिंती हुंदक्यांनी गहिवरल्या
बागवान कुटुंबीयांच्या घराला आग लागून काही लोक मृत झाल्याचे कळाल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात झाली गर्दी.
बागवान कुटुंबीयांचे नातेवाईक, सर्वोदयनगरमधील शेजारी, यांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाइकांचा आक्रोश इतका होता की सिव्हिल हॉस्पिटलच्या, भिंतीही गहिवरल्या.