सोशल मीडियावरून पसरवली अफवा; सोलापुरात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 13:45 IST2020-03-29T13:43:45+5:302020-03-29T13:45:27+5:30
विनाकारण रस्त्यावर दिसला की कपाळावर मारा शिक्का... अशी पोस्ट फेसबुकवरून व्हायरल करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मीडियावरून पसरवली अफवा; सोलापुरात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू झाली आहे. 'समाज का दुश्मन लॉकडाऊन उल्लंघन' विनाकारण रस्त्यावर सापडला की मारा शिक्का. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या फोटोसह अशी पोस्ट फेसबुक वर टाकून अफवा पसरवल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमर नामदेव पवार (वय 25 रा बुधवार पेठ जय मल्हार चौक सोलापूर), लक्ष्मण बाबुराव गायकवाड (वय 47 रा उत्तर सदर बझार सोलापूर), विक्रम रामचंद्र वाडे ( वय 40 रा 399 उत्तर सदर बझार सोलापूर), सुरेश सिद्राम पाटोळे (वय 44 रा 556 उत्तर सदर बाजार सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
रस्त्यावर विनाकारण दिसलात की कपाळावर पोलिसांकडून शिक्का मारला जाईल. या शिकयाला निवडणुकीच्या काळात बोटावर लावण्यात येणारी शाई वापरली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरात बसावे शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. अशा पद्धतीची पोस्ट तयार करून त्यामध्ये गोल शिक्का व पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो वापरून. खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी पोलीस शिपाई वसीम इसाक शेख ( सायबर पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.