येत्या शुक्रवारी पुन्हा पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:33+5:302021-02-05T06:45:33+5:30

दक्षिण सोलापूर : येत्या पाच फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पसरण्याच्या ...

Rain showers again next Friday | येत्या शुक्रवारी पुन्हा पावसाच्या सरी

येत्या शुक्रवारी पुन्हा पावसाच्या सरी

दक्षिण सोलापूर : येत्या पाच फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पसरण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष उत्पादकांच्या पोटात तर गोळाच आला आहे.

हवामान खात्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. ५ फेब्रुवारीपासून राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान राहणार आहे. पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कमी अधिक प्रमाणात राज्यभर असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

------

पिकांवर होणार रोगांचा प्रादुर्भाव

आंब्याच्या झाडांना मोहोर असल्याने पावसांमुळे बहार झडण्याची शक्यता असते. कांदा, भाजीपाला यावर तुडतुडे, रोगराई पसरते. ढगाळ हवामानामुळे पिकांची वाढ मंदावते. बुरशी, मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढू शकते. ज्वारी फुलोऱ्यात असेल तर ती झडते. ज्वारी काळी पडते. टपोरे थेंब आल्यास हरभऱ्याचे बोंड गळतात.

--------

द्राक्षांच्या हानीची शक्यता

अवेळी येणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसू शकतो. सध्या द्राक्षांचे घड वेलींना लगडलेले आहेत. अशा स्थितीत पाऊस आला तर घड नासण्याची शक्यता असते. दावण्या, बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाच्या टपोऱ्या थेंबाने घड, घडातील द्राक्षांचे मणी फुटतात. मालाची प्रत खालावते. दरावर त्याचा परिणाम होतो. विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांची जास्त हानी होते.

-------

हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या थंडी सुटली आहे. त्यामुळे पाऊस येईलच असे निश्चित सांगता येत नाही. ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होईल. याबाबत १ फेब्रुवारी रोजी ठोसपणे सांगता येईल पाऊस येणार की नाही.

- डॉ. चनगोंडा हाविनाळे, बरूर, द्राक्ष उत्पादक शेतकरी

Web Title: Rain showers again next Friday