मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:41 IST2025-12-31T12:40:06+5:302025-12-31T12:41:32+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
सोलापूर : मुंबईवरून हैदराबादकडे जात असलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी ही घटना घडली आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक एनएल ०१ बी १८६९) सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला. अपघातात खासगी ट्रॅव्हलचा बसचालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.
या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने या अपघातातील खासगी ट्रॅव्हल बस वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात खासगी ट्रॅव्हल्स चालक किरकोळ जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी लोकमत शी बोलताना दिली.