सोलापूर : एल.बी.टी. दर कमी करून आणि क्रुड तेलावरील जकातीवर योग्य निर्णय व्हावा, या मागणीसाठी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामध्ये सोलापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन सहभागी होणार आहे. त्यामुळे दि.२६ आॅगस्टपासून सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. एलबीटी दर कमी केल्यास आणि जकात निर्णय होईपर्यंत व्हॅटचा दर कमी केल्यास राज्यातील पेट्रोल दर पाच ते सहा रूपयांनी कमी होईल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. मात्र याबाबत राज्य सरकारशी वारंवार बोलणी करूनही शासनाने दाद दिली नाही. त्यामुळे फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दि.२६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकहितासाठी करण्यात आलेल्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.११ आॅगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतरही शासनाने संघटनेला या विषयावर चर्चेसाठी बोलावले नाही. राज्यात महागाईचा भडका उडालेला असताना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची संधी हे सरकार गमावत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.-----------------------------------प्रमुख मागण्या...डिझेलवरील व्हॅटचा दर ३ टक्के इतका कमी करून इतर राज्यांच्या तुलनेत समान दर ठेवल्यास डिझेलच्या महाराष्ट्रातील विक्रीत २५ टक्के इतकी वाढ होऊन राज्य सरकारला ६0७ कोटी अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तसेच महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल व डिझेल २ रूपये स्वस्त होईल. महाराष्ट्रातील महानगरपालिका सोन्याची विक्री जास्त होते, याचा आधार घेऊन सोन्यावर 0.१ टक्के दराने एल.बी.टी. आकारतात. पेट्रोल व डिझेल या जीवनावश्यक वस्तूंची महापालिका हद्दीतील विक्री सोन्यापेक्षा जास्त असूनही पेट्रोल व डिझेलवर २ टक्के ते ५ टक्के या दराने एल.बी.टी. आकारतात. एल.बी.टी. आकारणीचा दर 0.३0 पैसे प्रति लिटर केल्यास महापालिका हद्दीतील डिझेल विक्री २00 टक्के वाढून महापालिकांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. महापालिका क्षेत्रात पेट्रोल व डिझेल २ ते ४ रूपये प्रति लिटर स्वस्त होईल. राज्यात एक महाराष्ट्र एक कर लागू करावा. या तिन्ही मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल ५ ते ६ रूपयांनी स्वस्त होऊन राज्य सरकार व महापालिका यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल.-------------------------शहरात १९ तर जिल्ह्यात २१८ असे एकूण २३७ पेट्रोलपंप आहेत. या पंपांवर दररोज लाखो लिटर पेट्रोलची विक्री होते. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात ५ ते ६ रूपये जादा दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. सोलापुरातही तीच स्थिती आहे. लोकांना बसणारा भुर्दंड कमी करण्यासाठी महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने पुकारलेल्या बंदमध्ये सोलापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन सहभागी होणार आहे. - सुनील चव्हाण, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन.
शहरातील पंपचालकांचा बेमुदत बंदमध्ये सहभाग
By admin | Updated: August 23, 2014 00:54 IST