एका रात्रीत चार एकरांतील ज्वारीची कणसे गेली चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:07 IST2020-02-19T13:01:04+5:302020-02-19T13:07:28+5:30
ब्रह्मपुरीतील प्रकार; ज्वारीच्या कोठारात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ

एका रात्रीत चार एकरांतील ज्वारीची कणसे गेली चोरीला
मंगळवेढा : ब्रह्मपुरी (ता़ मंगळवेढा) येथे अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शेतकरी दादासाहेब कोकरे यांच्या पाच एकर शेतातील तब्बल चार एकरांवरील ज्वारीची कणसे खुडून नेली. यामुळे शेतकºयाचे तब्बल ५० पोती ज्वारीचे नुकसान झाले आहे.
गेली तीन वर्षे दुष्काळाने रब्बी व खरीप हे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेले. यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. ज्वारीला चांगला दर मिळेल ही अपेक्षा आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या कष्टावर आयता डल्ला मारणाºया चोरांच्या टोळीने शेतकºयाला हैराण केले आहे. या चोरीने शेतकरी भयभीत झाला आहे.
ब्रह्मपुरी येथील दादासाहेब कोकरे हे शेताकडे गेले असता त्यांना आपल्या चार एकर शेतातील ज्वारीची कणसे चोरट्यांनी तोडून नेल्याचे दिसून आले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. काही वेळ काय करावे, हे सूचेनासे झाले. त्यांनी तडक मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले व या ज्वारीच्या चोरीची फिर्याद दिली.
घरफोडी, दुकानातील चोरी, महिलांच्या अंगावरील दागिने, चोरीच्या घटनांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. सध्या सुगीचे दिवस असून, पोलिसांनी ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, बोराळे, मंगळवेढा शिवारात गस्त वाढवावी, अशी शेतकºयांतून मागणी होत आहे.
ब्रह्मपुरी शिवारात अशाप्रकारे चार एकर ज्वारीवर दरोडा टाकण्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांचा वचक कमी झाला आहे. या ज्वारी दरोड्याचा जोपर्यंत उलगडा होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या दरोड्यातील आरोपी तत्काळ गजाआड करून शेतकºयांना दिलासा द्यावा.
- विकास पुजारी, शेतकरी ब्रह्मपुरी