'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:59 IST2025-11-13T20:57:45+5:302025-11-13T20:59:44+5:30
पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये स्लॅबच्या छताला रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
Solapur Crime News: एसआरपीएफ कॅम्पशेजारी असलेल्या समर्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या वकील तरुणाने पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये स्लॅबच्या छताला रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याने ज्या खोलीत गळफास घेतला, तिथे पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून, आईमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.
ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय ३२, १५९, समर्थ सोसायटी, सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. यातील मयत सागर याने वकिलीची पदवी घेतलेली असून, तो न्यायालयात प्रॅक्टिस करीत होता.
बुधवारी दुपारच्या वेळी त्याने राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये गळफास घेतल्याची माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याला मिळाली. तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी हवालदार व्ही. डी. घुगे यांना घटनास्थळी पाठवले.
पंचनामा करून करून सागर यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली.
आईकडून दुजाभावाची वागणूक; पोलिसांना चिठ्ठी सापडली
सागर आणि त्याची आई यांच्यामध्ये मंगळवारी रात्री भांडण झाले होते. त्याचे वडील शासकीय सेवेत असून, त्याला एक बहीण आहे. तिचा विवाह झालेला आहे.
त्याने गळफास घेतलेल्या रुममध्ये झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना चिठ्ठी आढळून आली. त्यात 'आईकडून सतत होणारा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा. ही नम्र विनंती.' पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
महिन्यापूर्वी पोलिसांनी मारहाण केल्याची केली होती तक्रार
यातील मयत वकील सागर मंद्रुपकर यांनी महिन्यापूर्वी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिलेली होती.
महिन्यापूर्वी ते कामानिमित्त बारामतीला गेले होते, पहाटे सोलापुरात परतल्यानंतर त्यांनी मित्राला मोपेड घेऊन बोलावले होते. मात्र, ती वाटेतच बंद पडल्याने ती एसआरपीएफ कॅम्प रोडवर उभी करून दुसऱ्या दुचाकीने सागर यांस आणले.
परत येताना रोडवर लावलेली दुचाकी दिसली नाही. दुसऱ्या दिवशी मोपेड विजापूर नाका पोलिस ठाण्यात असल्याचे समजले. तेथे दुसऱ्या दिवशी ठाण्यात गेल्यानंतर मोपेडची डिक्की पोलिसांकडून उघडली गेल्याचे दिसून आले.
त्यात दोन मोबाइल व अन्य साहित्य मिळाले. यावेळी वकील सागर हा मित्राशी बोलत असताना पोलिसांना बोलल्याच्या गैरसमजुतीने सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी सागरला मारहाण केल्याची माहिती त्यावेळी दिली होती. यासंदर्भात बार असोसिएशनपर्यंत हे प्रकरण गेले होते. मागच्या घटनेचा आणि आत्महत्येचा काही संबंध आहे का? अशी चर्चा समर्थ सोसायटी परिसरात सुरू होती.