"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:38 IST2025-09-29T09:36:26+5:302025-09-29T09:38:04+5:30
Barshi Farmer Viral Video: पुराने शेतातील पिकांचा घास घेतला. डोक्यावर कर्जाचा डोंगर असलेल्या बापाने शेतातच गळफास घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी बापाची अवस्था काय होती, हे सांगणाऱ्या श्वेताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीचे हात पुढे येताहेत.

"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व
Barshi Farmer Daughter video: 'जसे माझे पप्पा गेले, तसे कुणाचे जाऊ नये. माझा बाप आमच्या गळ्यात पडून रडायचा. त्यांना १५-१५ मिनिटाला कॉल यायचे.' ह्रदय पिळवटून टाकणारे हे शब्द आहेत, श्वेताचे! बार्शी तालुक्यातील कारी गावातील शरद गंभीर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या मुलीचा म्हणजे श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी श्वेताच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
पूर आल्याने शेतातील पिके सडली. डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं या चिंतेने ग्रासलेल्या शरद गंभीर यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांची मुलगी श्वेताचा दुःख मांडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. तिच्या घरची परिस्थिती बघून अनेक हात मदतीसाठी पुढे आले असून, आमदार कैलास पाटील यांनीही कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला.
श्वेताला आधार, तिच्या भविष्याला आकार..
कैलास पाटील यांनी श्वेता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे. "आज जगभरात जागतिक कन्या दिवस साजरा होतो आहे, कन्येला देवी मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत मुलगी म्हणजेच घराचा आधार, आनंदाचा स्तोत्र आणि भविष्याची आशा.. पण या दिवशीच कारी गावातील श्वेताचे डोळे सतत पाणावलेले आहेत. कारण, श्वेताचे वडील एक प्रामाणिक कष्टकरी शेतकरी, अतिवृष्टीने झालेले प्रचंड नुकसान, कर्जाचा डोंगर आणि भविष्याची चिंता या सगळ्या ओझ्याखाली दबून त्यांनी स्वतःचे जीवन संपवले", असे त्यांनी म्हटले आहे.
तिच्या डोळ्यात अजूनही वेदना
"पण या सर्वात विदारक क्षण म्हणजे श्वेताने आपल्या वडिलांनी जीवन संपवताना स्वतःच्या डोळ्यांनी ते दृश्य पाहिले, त्या क्षणी तिच्या अंतःकरणात किती वादळ उसळली असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. आज श्वेताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी तिच्या डोळ्यांत अजूनही वडिलांच्या जाण्याचे दुःख, निराशा आणि वेदना दाटून आल्या होत्या", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
श्वेताला आधार, तिच्या भविष्याला आकार..
— Kailas Patil (@PatilKailasB) September 28, 2025
आज जगभरात जागतिक कन्या दिवस साजरा होतो आहे, कन्येला देवी मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत मुलगी म्हणजेच घराचा आधार, आनंदाचा स्तोत्र आणि भविष्याची आशा.. पण या दिवशीच कारी गावातील श्वेताचे डोळे सतत पाणावलेले आहेत..
कारण, श्वेताचे वडील एक प्रामाणिक… pic.twitter.com/mEZ27M0Nmb
तिच्या वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण...
"यावेळी तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली व श्वेताच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि तिला सांगितलं की, तुला कधीही, कशाचीही गरज पडली तर हक्काने सांग तु आता तू एकटी नाहीस आम्ही तुझ्यासोबत आहोत. श्वेताच्या वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही.. पण तिच्या आयुष्याला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे", अशा शब्दात त्यांनी धीर दिला.