ब्राह्मण महासंघातर्फे काश्मीरमध्ये वर्षभरात पाच लाख पर्यटक पाठविणार : गोविंदराव कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:22 IST2019-09-23T13:18:00+5:302019-09-23T13:22:26+5:30
ब्राह्मण समाज नाराज;‘नोटा’ वापरण्याची शक्यता ! शांततेसाठी काश्मिरात यज्ञ

ब्राह्मण महासंघातर्फे काश्मीरमध्ये वर्षभरात पाच लाख पर्यटक पाठविणार : गोविंदराव कुलकर्णी
सोलापूर : गेली सत्तर वर्षे ब्राह्मण समाज हा कायम जनसंघ, भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहिला आहे; मात्र महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. समाजातील व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद असतानाही या समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधारी पक्षाने साफ दुर्लक्ष केले. केवळ दुर्लक्षच केले असे नव्हे तर साधी भेटही नाकारली आहे. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण समाज नाराज असून आगामी निवडणुकीत नोटाचा वापर करण्याची शक्यता आहे, असे आज अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या समन्वय समितीची बैठक सोलापुरात झाली. त्या बैठकीसाठी गोविंदराव कुलकर्णी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा प्रा. मोहिनी पत्की यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये मूळ महाराष्ट्रीय ब्राह्मणांबरोबरच बिहारी, बंगाली, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा विविध प्रांतातून आलेला ब्राह्मण समाज रहात आहे. ही संपूर्ण संख्या सुमारे १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. एकूण मतदानाची टक्केवारी पाहता दहा टक्के आहे. त्यामुळे या सगळ्यांनी नोटाचा वापर केला तर सत्ताधाºयांचे काही आमदार निश्चितपणे पडू शकतात, असा आमचा विश्वास आहे. कर्नाटकात आम्ही हा प्रयोग केला आहे. त्याला यशही आले आहे. तसाच प्रयोग आम्ही आगामी निवडणुकीत करण्याच्या विचारात आहोत, असे कुलकर्णी म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३५ अ आणि ३७० हटविले आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन आहेच. त्याचबरोबर अ.भा. ब्राह्मण महासंघातर्फे आगामी वर्षभरात काश्मीरमध्ये ५ लाख पर्यटक पाठविण्यात येणार असून, शांतीसाठी काश्मीरमध्ये पाच महायज्ञही करणार आहे, असे ते म्हणाले.
सकाळच्या सत्रात झालेल्या बैठकीत संघटनात्मक धोरण, नियोजन आणि संघटनावाढीबाबत चर्चा करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत २२ जिल्ह्यात संघटना सक्रिय कार्यरत आहेत. उर्वरित जिल्ह्यात संघटनांची सुरुवात आहे. हळूहळू तेथील शाखाही सक्रिय होतील. त्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी राम तडवळकर, रोहिणी तडवळकर, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गोसावी, श्यामराव जोशी आदींसह कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
उच्च शिक्षणासाठी पाच ठिकाणी अॅकॅडमी
- ब्राह्मण समाजातील उच्च शिक्षित युवकांसाठी तसेच युपीएससी, एमपीएससी आणि त्या त्या राज्यातील पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे घेण्यात येणाºया स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशभरात पाच ठिकाणी अ.भा. ब्राह्मण महासंघातर्फे अॅकॅडमी उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे, बंगळुरु, भोपाळ, मुंबई आणि नवी दिल्ली या ठिकाणी या अॅकॅडमी उभारण्यात येतील. त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली.