राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 12:52 PM2022-04-04T12:52:45+5:302022-04-04T12:52:51+5:30

सामुदायिक शेततळ्याची योजना नावालाच

Farm scheme closed to Magel, a boon to farmers in the state | राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे योजना बंद

राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे योजना बंद

googlenewsNext

सोलापूर : मागेल त्याला शेततळ्याची योजना राज्य शासनाने ''क्लोज'' केली, तर निवड झालेल्या १९ सामूहिक शेततळ्यांपैकी तब्बल ११ रद्द केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदानावर शेततळी खोदणे कठीण होणार आहे.

तत्कालीन भाजपा - शिवसेना युती सरकारची मागेल त्याला शेततळ्याची योजना प्रभावी व लोकप्रिय ठरली होती. शेतकरी ऑनलाईनद्वारे शेततळ्यासाठी अर्ज करीत होते. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ''मागेल त्याला शेततळे'' योजनेकडे दुर्लक्ष सुरू केले. राज्यात सत्तेवर आल्यानंतर शेततळ्याला नव्याने मंजुरी देणे बंद केले व अनुदानही टप्प्या-टप्प्याने व विलंबाने येऊ लागले. त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजनेला घरघर लागणार, हे नक्की होते अन् तसेच झाले. आता ही मागेल त्याला शेततळ्याची योजना बंद करण्यात आली आहे.

पूर्वीपासूनच सुरू असलेली सामूहिक शेततळ्याची योजना सुरू असली तरी, ती नावालाच सुरू आहे. मागील वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात १९ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी ११ शेततळ्यांची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. एक तळे पूर्ण झाले आहे, तर ७ तळ्यांचे काम प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

''एक वर्ष एक तळे''

सोलापूर जिल्ह्यात बागायतीसोबत फळबागांचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. फळबागा अन् शेततळे हे सूत्रच ठरले आहे. मात्र मागील वर्षभरात जिल्ह्यात एकच सामूहिक शेततळे झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे प्रस्ताव असले तरी, शासनाने मंजुरीअगोदरच योजना बंद केली आहे. खोदाई, अस्तरीकरण व संरक्षण तारेच्या सामूहिक शेततळ्यांसाठी २४ × २४ × ४ मीटर - एक लाख ७५ हजार, ३० × ३० × ४.७ मीटर - दोन लाख ४८ हजार, ३४ × ३४ × ४.४ मीटर - ३ लाख ३९ हजार.

चौकट

अशी झाली मागेल त्याला शेततळी...

  • *उत्तर तालुका- ५७०
  • * दक्षिण तालुका- ७२१
  • * मोहोळ तालुका - १२१५
  • * अक्कलकोट - ६९४
  • * बार्शी तालुका - ८७६
  • * माढा तालुका - १८१०
  • * करमाळा - ५३५
  • * पंढरपूर - १९८५
  • * सांगोला - १९७९
  • * मंगळवेढा - १०३५
  • * माळशिरस - ९९४
  • एकूण - १२, ४३२

* जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे ४७ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी २२ हजार ५८२ शेततळ्यांना मंजुरी दिली होती. १२,४३२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली, तर योजना बंद होताना ३४५५५ शेततळी रद्द करण्यात आली.

 

मागील वर्षभरात दोन वेळा मागेल त्याला शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. मंजूर किंवा नामंजूर काहीच समजले नाही. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस आहे, परंतु गरज म्हणून शेततळ्याचे काम करायचे आहे.

- निशिकांत देशमुख, अर्जदार शेतकरी

Web Title: Farm scheme closed to Magel, a boon to farmers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.