सोलापूरात गॅसचा स्फोट होऊन शाळकरी मुलांची व्हॅन जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:24 IST2018-09-26T18:21:46+5:302018-09-26T18:24:45+5:30
नागेश करजगी आॅर्किड स्कूल येथील घटना: चालक जखमी, विदयार्थी वाचले

सोलापूरात गॅसचा स्फोट होऊन शाळकरी मुलांची व्हॅन जळून खाक
सोलापूर : मुरारजी पेठ येथील नागेश करजगी आॅर्किड स्कूल समोर विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन क्रमांक एमएच १४ पी १०३६ ही जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ या घटनेत चालक जखमी झाला सुदैवाने व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्याने कोणतेही जिवितहानी झाली नाही़ या प्रकारामुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली होती.
गणेश मधुकर मोरे ( वय-३८ रा. असे वस्ती आमराई) हा वाहन चालक दुपारी दोन वाजता विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी नागेश करजगी आॅर्किड स्कूल समोर आला होता़ शाळा सुटायच्या अगोदर तो आपल्या व्हॅनमध्ये गॅस भरत होता गॅस लिकेज झाल्याने यांनी पेट घेतला़ चालक गणेश मोरे हा मारुती व्हॅन मधून बाहेर पडला.
दरम्यान मारुती व्हॅन ला मोठी आग लागली. हा प्रकार लक्षात येताच शाळेतील शिपायांनी तात्काळ फायर ब्रिगेडला कळविले. फायर ब्रिगेड अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मारुती व्हॅनमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. चालक गणेश मोरे ला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारुती व्हॅन जळून खाक झाल्याने पालकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शाळाचालकांनी खाजगी व्यायाम चालकावर ठपका ठेवत, पालकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचे सांगितले.