उजनीतील पाणी पातळीत घट; सोगाव पाण्याबाहेर, शिल्पे पडली उघडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:16 IST2019-06-14T20:14:13+5:302019-06-14T20:16:05+5:30
दुष्काळाची दाहकता; १९७५ मध्ये गडप झालेल्या वास्तू पुन्हा पाण्याबाहेर

उजनीतील पाणी पातळीत घट; सोगाव पाण्याबाहेर, शिल्पे पडली उघडी
कोर्टी : दुष्काळामुळे उजनीची पाणीपातळी कमालीची घटल्याने पात्रातील सोगाव पश्चिम (ता. करमाळा) या गावाचे प्राचीन अवशेष पाण्यातून बाहेर आले आहेत. करमाळा तालुक्यातील राजुरी गावापासून सात किलोमीटर उजनीकडच्या भागात गेले की उजनी पात्रात उघडे पडलेले हे प्राचीन गाव दिसते. सुमारे १९७५ साली हे प्राचीन गाव उजनीच्या पाण्याखाली गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.
लांबूनच हा परिसर पाहणाºयाला आकर्षित करत आहे. उजनीची पाण्याची पातळी खालावली की हे प्राचीन गाव पाहायला मिळते. संपूर्ण परिसर मोठ्या दगडी शिळांनी व्यापला आहे. हे प्राचीन गाव पाहताना अनेक इतिहासातल्या गोष्टी पाहायला मिळतात. सुंदर नक्षीकाम करून, आखीव-रेखीव घडवून तयार केलेल्या चौरस शिळा, पाण्यात असलेली काही मूर्तीस्वरूपातील हेमाडपंथी शिल्पे जिवंत वाटतात. यामध्ये प्रामुख्याने राधाकृष्ण, नंदी, देवीदेवतांच्या मूर्तींचे कोरीव काम पर्यटकांना पाहायला मिळते.
गेल्या अनेक वर्षांपासून हे अवशेष पूर्णपणे पाण्याखाली असूनही शिल्पे चांगल्या स्थितीत आहेत. प्राचीन शिल्पकलेचा हा उत्तम नमुना असून, अनेक घरांचे अवशेष ढासळलेले आहेत.
उजनीचे पाणी वाढत जाते तसे या जुन्या प्राचीन गावाचे अवशेष पाण्याखाली जातात. या वर्षी पाण्याची पातळी खूप खोल गेल्यामुळे ही शिल्पे उघडी पडली. परिसरातील अनेक तरुण ही शिल्पे पाहायला येत असून, याचे संवर्धन करायला हवे.
- वैभव गोसावी, ग्रामस्थ