'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:16 IST2025-09-24T11:13:23+5:302025-09-24T11:16:17+5:30

Ajit Pawar Maharashtra flood: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्याला सुरूवात केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

'Dada, declare a wet drought'; Ajit Pawar told farmers, "Now we will inspect..." | 'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."

'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."

Ajit pawar Latest News: राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीला आलेल्या महापुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली. पुराचा फटका बसलेल्या गावांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेटी देण्यास सुरूवात केली. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावाच्या शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. यावेळी काही शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर 'आम्हाला आधी पाहणी तर करू दे', असे म्हणत थेट उत्तर देणं टाळलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौऱ्याला सकाळी (२४ सप्टेंबर) सुरूवात केली. करमाळा तालुक्यातील कोर्टी इथे त्यांनी नासाडी झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवारांना शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्याचबरोबर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही केली. 

त्यावर अजित पवार म्हणाले, "मी पण शेतकरी आहे. तूही शेतकरी आहेस. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते करणार आहे. आता आम्हाला पाहणी तर करू द्या. तुमच्यासारख्यांकडूनच काय नुकसान झाले आहे, हे मी समजून घेत आहे", असे सांगत त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर बोलने टाळले. 

काही शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या भागात ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजित पवार त्यावर म्हणाले की, हे डोक्यातून काढून टाका. ह्या ठिकाणी ६५ मिलिमीटर पाऊस झाला नाही. सीना नदीमध्ये वरच्या भागातून पाणी आले आहे. नदीच्या दोन्ही दुतर्फा पात्रातील पाणी शिरले. त्यामुळे जमीन खरडून गेली आहे."

"एका दिवसात ६५ मिलिमीटर पाऊस झाला नाही. रोज थोडा थोडा पाऊस झाला. मी डोळ्यांनी सगळी परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे काळजी करू नका", असेही अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले. 

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवारांनी प्रशासनाला दिले.

पुण्यातील ‘जनसंवाद’ कार्यक्रम पुढे ढकलला

राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यास अजित पवारांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे पूर्व नियोजित काही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे २४-२५ सप्टेंबरला जनसंवाद कार्यक्रम होणार होता. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीच्या पालकमंत्री, आमदारांना पाहणी करण्याचे निर्देश 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर, गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा व मदत द्यावी, तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी असे निर्देश दिले आहेत.

Web Title: 'Dada, declare a wet drought'; Ajit Pawar told farmers, "Now we will inspect..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.