प्रवाशांना दिलासा; एसटीकडून कॅशलेस व्यवहारासाठी ‘ओटीसी’ कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:44 IST2020-10-28T15:39:48+5:302020-10-28T15:44:01+5:30
सुटे पैशांची अडचण दूर; कार्डद्वारे शॉपिंगही करता येणार

प्रवाशांना दिलासा; एसटीकडून कॅशलेस व्यवहारासाठी ‘ओटीसी’ कार्ड
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रवाशांसाठी ‘ओटीएस’ कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे़. या कार्डद्वारे प्रवाशांना प्रवासादरम्यान सुट्या पैशाची अडचण भासणार नाही़ सोबतच यातून शॉपिंगही करता येणार आहे़.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असून, नवीन योजना प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान अनेकवेळा सुट्या पैशांची अडचण निर्माण होते़ यामुळे प्रवासी आणि वाहकांदरम्यान वाद निर्माण होतात़ या कार्डच्या माध्यमातून हे वाद होण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.
‘ओव्हर द काउंटर’ म्हणजेच ओटीसी कार्ड हे इतर कार्डसारखे आहे़ पण हे कार्ड घेतल्यास कुटुंूबातील सर्वांसोबतच आपल्या ओळखीतील व्यक्तींनाही देता येणार आहे़ हे कार्ड वापरताना ओळखपत्र असणेही बंधनकारक नसणार आहे़ हे कार्ड खासगी एजंट यांच्याकडून उपलब्ध होणार असून यावर रिचार्ज केल्यास कार्डद्वारे तिकीट तर घेता येणार आहेच, सोबत खरेदीही करता येणार आहे़.
कार्ड घेण्याचे आवाहन
महामंडळाने नवीन कार्ड आणल्यामुळे कर्मचाºयांनाही हे कार्ड कसे हाताळायचे याची माहिती देण्यात येत आहे़. हे कार्ड सर्वांसाठी उपयुक्त असून याचमुळे प्रवाशांना याचा फायदा होणार असून, प्रवाशांनी हे कार्ड घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़