ऑनलाइन वधू-वर सूचकवर ओळख निर्माण करून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:27 IST2019-11-22T15:23:45+5:302019-11-22T15:27:07+5:30
सोलापुरातील घटना; बीअरबार चालकावर गुन्हा दाखल

ऑनलाइन वधू-वर सूचकवर ओळख निर्माण करून महिलेवर अत्याचार
सोलापूर : ऑनलाइन वधू-वर सूचकवर अॅपवरून महिलेशी ओळख निर्माण करत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाºया नाशिकमधील बीअरबार चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरमध्ये राहत असलेल्या एका घटस्फोटित महिलेने पुन्हा विवाह करण्यासाठी ऑनलाइन वधू-वर सूचकवर नोंदणी केली़ त्यावरून महिलेची नाशिक येथे असलेल्या संग्राम पाटील याच्याशी ओळख झाली़ या संकेतस्थळावरून मोबाईल नंबर मिळवून त्याने पीडित महिलेशी संपर्क केला़ त्याने आपले खरे नाव कैलास ज्ञानेश्वर विखेपाटील असे असल्याचे सांगितले आणि तो त्याच्या आई-वडिलांसह लोणी जि़ अहमदनगर येथे राहत असल्याचे सांगत, तू सर्वांना पसंत असल्याचे सांगितले.
यामुळे जुलै २०१९ मध्ये दोघांनी मिळून कैलास विखेपाटील हा राहत्या ठिकाणी ता़ लोणी, जि़ अहमदनगर येथे जाऊन लग्नाची बोलणी केली़ त्यानंतर काही दिवसांनी कारण सांगत तिला आपल्या घरी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला़ यानंतर कैलास आणि त्यांच्या कुटुंबीयानी पीडित महिलेचा फोन घेणेही टाळू लागले़महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र माझे नातेवाईक राजकीय पुढारी आहेत, आमचे बीअरबारचे दुकान आहे, अनेक पोलीस माझ्या ओळखीचे आहेत, तू माझे काही वाकडे करू शकणार नाही तू तसे केल्यास तुझे जगणे मुश्कील करेन अशी धमकी त्याने दिली.
यामुळे महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कैलास याला बोलावून घेतल्यानंतर त्याने लग्न करणार असल्याचा जबाब दिला आणि त्यानंतरही काही दिवसानंतर त्याने बोलणे बंद केले आणि विवाहासाठी टाळाटाळ केली अशी फिर्याद पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे़ या फिर्यादीवरून कैलास विखेपाटील रा़ लोणी अहमदनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.