घरातून हाकलून देईन...; सुनेच्या मानसिक त्रासामुळे ७३ वर्षीय वृद्धाने स्वतःच्याच घरात संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:31 IST2026-03-11T15:27:03+5:302026-03-11T15:31:17+5:30
बार्शीत सुनेच्या जाचाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.

घरातून हाकलून देईन...; सुनेच्या मानसिक त्रासामुळे ७३ वर्षीय वृद्धाने स्वतःच्याच घरात संपवलं आयुष्य
Solapur Crime: सोलापुरच्या बार्शी तालुक्यात एका ७३ वर्षीय वृद्धाला त्याच्याच घरात परकं व्हावं लागल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं. सुनेचा सततचा अपमान, मानसिक छळ आणि घराबाहेर हाकलून देण्याच्या धमक्या या असह्य त्रासाला कंटाळून सर्जेराव शंकरराव नायकुडे या वृद्ध पित्याने अखेर विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बार्शीतील नाईकवाडी प्लॉट परिसरात मंगळवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे त्यांचे सुपुत्र महेश नायकुडे यांच्यासोबत नाईकवाडी प्लॉट येथील बंगल्यात राहत होते. सर्जेराव यांचे दुसरे चिरंजीव उमेश आणि त्यांची पत्नी सारिका हे कुर्दुवाडी रोड परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सर्जेराव हे उमेशच्या घरी राहत असताना, सून सारिका हिने किरकोळ कारणावरून त्यांचा वारंवार अपमान करण्यास सुरुवात केली होती.
घरातून हाकलून देईन; सुनेच्या धमकीने खचले वडील
तक्रारीनुसार, सून सारिका ही केवळ टोमणे मारून थांबली नाही, तर तिने सासऱ्यांना घरातून हाकलून देईन अशी थेट धमकीही दिली होती. स्वतःच्या मुलाच्या घरात मिळणारी ही वागणूक सर्जेराव यांच्या जिव्हारी लागली. या सततच्या मानसिक तणावामुळे ते प्रचंड खचले होते. अखेर, हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरी विषारी द्रव्य पिऊन टोकाचे पाऊल उचलले. १० मार्च रोजी सकाळी १० च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मयत सर्जेराव यांचा मुलगा महेश नायकुडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. आपल्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सून सारिका उमेश नायकुडे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माकणे करत आहेत. या घटनेमुळे वृद्धांच्या सुरक्षिततेचा आणि कौटुंबिक संस्कारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.