सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST2025-04-27T14:20:25+5:302025-04-27T14:20:39+5:30
मनीषा वापरत असलेला संगणक जप्त केला असून, त्यामधून मिळणाऱ्या दस्तऐवजांतून आणखी काही धागेदोरे मिळाल्यास त्यावर अधिक विचार होऊ शकतो.

सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
सोलापूर : विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये जप्त केलेल्या मोबाइलच्या कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आल्यास तपासाला गती मिळू शकते. यासाठी न्यायालयीन कोठडीतील मनीषाला पुन्हा पोलिस कोठडी मिळवून तपास करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
मनीषा वापरत असलेला संगणक जप्त केला असून, त्यामधून मिळणाऱ्या दस्तऐवजांतून आणखी काही धागेदोरे मिळाल्यास त्यावर अधिक विचार होऊ शकतो. घटनास्थळावरून पोलिसांनी डॉक्टरांचे रक्ताचे डाग असलेले कपडे, टॉवेल, नॅपकीन, जिवंत काडतूस, ओढलेल्या १९ सिगारेट्स, बुलेटमधील शिसे, बुलेटच्या वरील आवरण, पिस्टल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, त्या रिपोर्टवरही अवलंबून आहे. याकडेही लक्ष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तपासात काय मिळाले?
डॉक्टरांच्या बेडरूममधून ७० हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मोबाइल, ग्रे कलरचा ६० हजारांचा दुसरा मोबाइल, एक पेन ड्राइव्ह, डॉक्टरांच्या नावे असलेला शस्त्र परवाना याशिवाय मनीषाने डॉ. आश्विन, डॉ. शिरीष वळसंगकर, साक्षीदार डॉ. उमा वळसंगकर यांना पाठवलेल्या ई-मेलची छायांकित प्रत जप्त केली. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
व्हिसेरा रिपोर्टला उशीर?
शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचे यापूर्वीच पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिसेरा मिळण्यास ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ लागू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अनुत्तरीत प्रश्न
- मनीषाचा संगणक जप्त करायला उशीर झाला का?
- मृतदेह लगेचच शासकीय रुग्णालयाकडे का नेला नाही?
- डॉक्टरांनी मृत्युपत्र का बदललं, या घटनेशी त्याचा संबंध होता काय?
- डॉ. आश्विन यांच्या जबाबातून कोणती माहिती पुढे आली?