सोलापूरच्या युवकाचा मालेगावात खून झाल्यानंतर आईकडून व्हिडीओ कॉलव्दारे ओळख पटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 05:15 PM2021-09-20T17:15:02+5:302021-09-20T17:15:38+5:30

बिट क्वाईन हेराफेरी: व्हॉटस ॲपवर आईला फोटो दाखवून पटविली ओळख

After the murder of a youth from Solapur in Malegaon, he was identified by his mother through a video call | सोलापूरच्या युवकाचा मालेगावात खून झाल्यानंतर आईकडून व्हिडीओ कॉलव्दारे ओळख पटविली

सोलापूरच्या युवकाचा मालेगावात खून झाल्यानंतर आईकडून व्हिडीओ कॉलव्दारे ओळख पटविली

Next

सोलापूर: बिट क्वाईनच्या हेराफेरीतून मूळच्या सोलापूरच्या पण सध्या नागपुरात वास्तव्यास असलेल्या माधव यशवंत पवार (वय ३२) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृताची ओळख पटविण्यासाठी सोलापुरातील त्याच्या आईला मृतदेह व्हिडिओ कॉलिंगवरून दाखविण्यात आला.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील पांगरी कुटे (ता. मालेगाव, जि. वाशिम) गावानजिकच्या शेतात १२ सप्टेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उप-अधीक्षक यशवंत केडगे यांच्यासह मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृताच्या अंगावर कपडे नव्हते व कपाळ, पोटावर गोळी मारल्याचे दिसून आले. अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीचा खून असा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला. मृताचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागपुरातील मित्रांनी त्याची ओळख सांगितली; पण नागपुरात त्याचे नातेवाईक कोणीच नव्हते. तपास केल्यावर त्याची आई व मामा सोलापुरात राहत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या आईला संपर्क केला. आईला पॅरेलेसीस व मामाचे किडनीची शस्त्रक्रिया झाल्याने नागपूरला येऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी व्हिडिओ क्वाॅलिंग करून त्याचा मृतदेह दाखविला. आईने मुलाला ओळखले. पोलिसांनीच त्याचे अंत्यसंस्कार उरकल्याचे उप-अधीक्षक केडगे यांनी सांगितले.

कोण हा माधव पवार

खून झाल्यानंतर माधव पवार याचा संपूर्ण इतिहास पोलिसांनी उघड केला. तो मूळचा सोलापूरचा असला तरी दहा वर्षांपूर्वी तो नागपूरला राहायला गेला होता. तेथील ईथर ट्रेड ऐशिया या कंपनी अंतर्गत बिट क्वाईनच्या व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होत असे. या कंपनीतील हिशेब तो ठेवत होता. बिट क्वाईनमध्ये हेराफेरी केली म्हणून त्याला शिक्षा झाली होती. यातून तो बाहेर आल्यावर नागपुरातून त्याचे अपहरण करण्यात आले होते.

तिघांना अटक, तिघे फरार

माधव याचा खून झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तो राहत असल्याच्या कॉलनीतून माहिती काढली. त्याच्या संपर्कात असलेले शुभम कान्हारकर, विक्की मोहोड, व्यंकटेश भगत यांना ताब्यात घेतल्यावर आणखी तीन साथीदारांच्या मदतीने त्यांनी माधव याची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने उप -अधीक्षक केडगे यांनी सांगितले.

घरचे नव्हते संपर्कात

माधव याची आई जुळे सोलापुरात राहते. तिला पॅरेलेसीस झाला आहे. त्यामुळे ती अंथरुणाला खिळून आहे. तो जेलमध्ये गेल्यावर नातेवाइकांचा संपर्क तुटला. त्यामुळे त्याच्याजवळील सर्व कागदपत्रावर नागपूरचा पत्ता होता. त्याच्याजवळ कोणीच राहत नव्हते. माहिती काढून पोलिसांनी आई व मामाला संपर्क केला.

Web Title: After the murder of a youth from Solapur in Malegaon, he was identified by his mother through a video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.