मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील २४ तोळे सोन्याचा कळस चोरीला; सोलापूरजवळील घटना
By Appasaheb.patil | Updated: August 31, 2022 12:40 IST2022-08-31T12:40:14+5:302022-08-31T12:40:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील २४ तोळे सोन्याचा कळस चोरीला; सोलापूरजवळील घटना
सोलापूर : सोलापूर-तुळजापूर महामार्गावर हिप्परगा येथे असलेल्या प्रसिध्द मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील २४ तोळे वजनाचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून भेट देऊन पाहणी केली. या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावामध्ये रोडलगत मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरावर भाविकांच्या योगदानातून २४ तोळे सोन्याचा कळस बसवण्यात आला होता. मंदिराच्या वरच्या बाजूला चढून चोरट्यांनी हा कळस चोरला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची मंदिरासमोर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोलापूर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. डॉग स्कॅाड मागविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू करायला सुरूवात केली. या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच मंदिरावरील कळस २०१६ साली चोरीला गेला होता. आता पुन्हा कळस चोरीला गेल्याचे मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.