Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:56 IST2025-09-30T14:52:25+5:302025-09-30T14:56:35+5:30
Social Viral: गोवा विमान तळावरील एका व्हायरल व्हिडीओनुसार एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी स्पिकर्सची व्यवस्था केली असून उत्साही प्रवाशांबरोबर फेरही धरला आहे.

Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट!
भारतीय उत्सवप्रेमी आहेत यात शंकाच नाही. त्यामुळेच परदेशी गेले तरी सोबत आपली संस्कृती घेऊन जातात आणि साजरीही करतात. नवरात्रीत(Navratri 2025) ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये गरबा खेळतात हे तुम्ही पाहिले, वाचले असेल, पण चक्क गोवा एअर पोर्टवर गरबा खेळून प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतलं.
नवरात्रीच्या काळात सुरतला गरब्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांची गोव्याहून सुटणारी फ्लाईटला पाच तास लेट झाली. तांत्रिक कारणामुळे फ्लाईट उशिरा येणार असल्याने, प्रवाशांना एअरपोर्टवर वाट पाहणे अपरिहार्य होते. मात्र,काही काळाने प्रवाशांनी मरगळ झटकून एअर पोर्टवर म्युझिक सिस्टीम मागवली आणि चक्क गाणी लावून उत्साहाने फेर धरला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुरतला जाण्यास उत्सुक असलेल्या एका प्रवाशाने गरबा खेळण्याची इच्छा फ्लाईट अटेंडंटकडे व्यक्त केली आणि त्यानंतर एका एअरलाईन कर्मचाऱ्याने पुढाकार घेत एअरपोर्टवर लगेच स्पीकर्सची व्यवस्था केली. स्पीकरवर पारंपारिक गरब्याचे संगीत सुरू होताच, गोव्याचा एअरपोर्ट काही क्षणातच गरबा मैदान झाले.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रवासी उत्साहाने टाळ्यावर टाळ्या देत, गोल रिंगणात गरबा खेळताना दिसत आहेत. केवळ प्रवासीच नव्हे, तर एअरलाईनचे कर्मचारीही त्यांचे काम सांभाळून या आनंदात सहभागी झाले आणि तेही थिरकले. गुजरातमध्ये जाऊन गरबा खेळण्याची हौस प्रवाशांनी एअरपोर्टवर भागवली आणि स्वतः बरोबर इतरांनाही सामावून घेतले.
या घटनेतून हे स्पष्ट होते की, एखाद्या गोष्टीची सतत तक्रार न करता त्यातून मार्ग काढायचा ठरवला तर तो निघतो, आनंद देता येतो आणि घेताही येतो. फक्त त्यासाठी परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन हवा. पहा व्हिडिओ -