लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:21 IST2022-05-20T17:20:34+5:302022-05-20T17:21:23+5:30
opened fire : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार
लखनऊ : लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचलेल्या नववधूचं स्वागत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी वधूसोबत तिचा नवरा सुद्धा होता. सासरच्या घरी पोहोचल्यानतंर दारात केलेल्या वधूच्या या कृत्याला तिच्या पतीनेही पाठिंबा दिला.
दरम्यान, लग्न आटोपून नवीन नवरी सासरच्या घरी पोहोचली. नववधू सासरच्या दारात स्वागतासाठी पोहोचताच पतीने तिला पिस्तूल दिले. नववधूनेही हातात पिस्तूल घेऊन हवेत गोळीबार केला. यादरम्यान, उपस्थित असलेल्या एकाने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याप्रकरणी पोलीस कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण खंडौली येथील नाऊ सराय येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोढी नावाच्या तरुणाचे तीन दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर वधू सासरच्या घरी पोहोचली. घरात प्रवेश करण्यापर्वी पतीने तिचे स्वागत करत आपल्या पत्नीचा घरातील प्रवेश संस्मरणीय करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली. पतीने पिस्तूल मागवून नवविवाहित वधूकडे दिली.
यानंतर पतीने नवविवाहित पत्नीला गोळीबार करण्यास सांगितले, मात्र गोळीबारादरम्यान पतीने पत्नीचा हात धरला होता. त्यानंतर हवेत गोळीबार केला. यानंतर वधूला घरात प्रवेश देण्यात आला. येथे घरातील इतर महिलांनी रीतिरिवाजानुसार वधूला प्रवेश दिला. पण, झालेल्या या प्रकारमुळे उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.