तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:53 IST2025-11-06T14:52:57+5:302025-11-06T14:53:47+5:30
Anunay Sood Death: मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट!

तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
Anunay Sood Death: प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर अनुनय सूद याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी अनुनयने जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबाने इंस्टाग्रामद्वारे निधनाची पुष्टी केली, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनुनय अमेरिकेत फिरायला गेला होता आणि हाच प्रवास त्याचा शेवटचा ठरला.
46 देश फिरला...
अनुनय सूद जगभरातील 46 हून अधिक देश फिरला. तो आपल्या प्रवासातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करायचा. इंस्टाग्रामवर त्याला 14 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि यूट्यूबवर सुमारे 3.84 लाख सब्सक्रायबर्स होते. आपल्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुनयने सोशल मीडियावर वेगळीच छाप सोडली होती.
फिरण्यासाठी कॉर्पोरेट करिअर सोडले
अनुनयचा प्रवास एखाद्या प्रेरणादायी चित्रपटासारखा होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात एका कॉर्पोरेट नोकरीतून केली, पण ती त्याच्यासाठी फक्त प्रवासासाठी निधी जमा करण्याचे साधन होती. प्रवास आणि फोटोग्राफी हीच त्यांची खरी आवड होती. तो नेहमी सांगायचा की, हा बदल एका रात्रीत घडलेला नाही. त्याने Skyscanner सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून जागतिक प्रवास सुलभ केला. त्याचा प्रसिद्ध “Everywhere Search” हा ट्रॅव्हल हॅक अनेक प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठरला. त्याने दाखवून दिले की, प्रवास हा केवळ श्रीमंतांचा छंद नसून, योग्य नियोजनाद्वारे कोणीही करू शकतो.
फोर्ब्स लिस्टमध्ये सलग तीन वर्षे स्थान
अनुनय सूद याची ओळख केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नव्हती. त्याला Forbes India च्या टॉप 100 डिजिटल स्टार्स लिस्टमध्ये सलग तीन वर्षे (2022, 2023, 2024) स्थान मिळाले. तसेच त्यांना ‘ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर ऑफ द इयर’ हा Exhibit Awardsचा सन्मान मिळाला होता. त्याच्या फोटोग्राफी आणि प्रवास कथा National Geographic India, Conde Nast Traveller India आणि Lonely Planet India सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये झळकल्या होत्या. सोशल मीडियासह, तो दुबईमध्ये डिजिटल आणि परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनीही चालवत होता.
लास वेगासमध्ये थांबला ‘प्रवास’
विडंबना म्हणजे, जेव्हा त्याचे करिअर उच्चांकावर होते, तेव्हाच जीवनाचा प्रवास थांबला. लास वेगासमधून त्याने केलेली पोस्ट, त्याची अखेरची ठरली.