धक्कादायक! इन्स्टावरील मैत्री पडली महागात; मित्रानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:25 IST2024-06-22T13:20:55+5:302024-06-22T13:25:34+5:30
सोशल मीडियाचा वापर काहींसाठी खास, तर अनेकांसाठी उद्ध्वस्त करणारा ठरतो.

धक्कादायक! इन्स्टावरील मैत्री पडली महागात; मित्रानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...
Social Viral : फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यांसारखी समाजमाध्यमे सध्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहेत. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले बिघडत आहेत.
सोशल मीडियाचा वापर काहींसाठी खास, तर अनेकांसाठी उद्ध्वस्त करणारा ठरतो. असाच एक प्रकार यूपीतील गाझियाबादमध्ये समोर आला आहे. येथे केवळ १३ वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामवरील एका मित्राला भेटायला हॉटेलवर गेली. तिथे असे काही घडले की, मुलीने आत्महत्या केली आहे.
ही घटना मोदीनगरमध्ये घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीची हिमांशू सोनी नावाच्या व्यक्तीशी इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली होती. दोघेही इन्स्टाग्रामवर बोलू लागले होते. यानंतर दोघांनीही भेटायचे ठरवले. हिमांशू सोनी याने अल्पवयीन मुलीला घेऊन हॉटेल गाठले आणि ओळखपत्र न देता येथे खोली घेतली. त्यासाठी त्याने जास्त पैसे मोजले. आरोपीने मुलीला आधी नशेचा पदार्थ दिला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती.
कुटुंबाला याबाबत माहिती कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करताच तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. मात्र मुलीला हे सर्व सहन न झाल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीला अन् हॉटेल मालकालाही अटक करून हॉटेल सील करण्यात आले आहे. इतक्या कमी वयामध्ये सोशल मीडिया वापरण्यास देण्यावरून नेटकरी पालकांवर टीका करत आहेत.