Work on flyover in Kankavali stalled! | कणकवलीतील उड्डाणपूलाचे काम रखडले !

कणकवली येथील महामार्ग उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये वाहतुकीस खुला होण्याची चिन्हे धूसर ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड

सुधीर राणे 

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत त्या कामाचा दर्जा व स्थिती पाहिली असता हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे. तर वेळोवेळी अनेक प्रसंगातून ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणाच समोर येत आहे.

कणकवली येथील विजय भवनच्या सभागृहात महामार्ग कामाची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे रोजी झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, संजय पडते,अतुल रावराणे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार आर.जे.पवार,महामार्ग प्राधिकरण अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गडनदी ते जानवली नदी उड्डाण पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार ? याबाबत कणकवलीवासीयांच्यावतीने संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी कणकवलीतील उड्डाण पूल ऑक्टोबर मध्ये वाहतूकीस खुला होईल.असे दिलीप बिल्डकाँनचे गौतमकुमार यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कणकवली एस.एम. हायस्कूल नजीक बॉक्सेलच्या भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे कणकवली वासीयांनी आंदोलन करावे लागले. तर सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

बॉक्सेल ऐवजी पूर्ण पिलर घालून उड्डाणपुलच करा अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आपल्या पक्षातील इतर नेत्यांच्या सोबत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्न करीत आहेत. खासदार विनायक राऊत यांनीही या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. या मागणीला यश यावे अशी कणकवलीवासीयांची इच्छा आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना ३१ जुलै रोजी तेथील स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे परत कणकवलीवासीय आक्रमक झाले. ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड होत असल्याने दुर्घटना घडून जीवितहानी होवू नये यासाठी गणेशोत्सव होईपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे.

त्यानंतर उबाळे मेडीकल जवळ उड्डाणपुलाच्या खाली सर्व्हिस रोड लगत सुरक्षिततेसाठी उभा केलेला एक पत्रा ४ ऑगस्ट रोजी चारचाकी गाडीवर पडला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी न घेतल्याने अशा दुर्घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. त्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कामगारांना काम करताना अडचणी येत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

तीन वर्षाहून अधिक काळ महामार्ग चौपदरीकरणाचे काम सूरु आहे. त्यामुळे फार मोठी गैरसोय होत असून कणकवलीवासीय आता या कामाला कंटाळले आहेत. केव्हा एखदा हे काम पूर्ण होते आणि आपली वारंवार उदभवणाऱ्या समस्यांपासून सुटका होते. असे त्याना झाले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांनी वेळीच याकडे लक्ष देऊन महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेल्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला आता त्यांना लवकरच सामोरे जावे लागेल.

महामार्ग समस्यांप्रकरणी उपोषण !

महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कणकवली वासीयांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. वयोवृद्ध नागरिकांनी उपोषणही केले होते. तर महामार्ग प्राधिकरणच्या उपभियंत्यांवर चिखलफेकही झाली होती. आता परत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्ताना शासनाकडून आता तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

Web Title: Work on flyover in Kankavali stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.