Sindhudurg: कारची मोपेडला धडक; महिला ठार, दोन चिमुकल्यांसह दिव्यांग पती बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:42 IST2025-08-05T15:42:02+5:302025-08-05T15:42:39+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील घटना

Sindhudurg: कारची मोपेडला धडक; महिला ठार, दोन चिमुकल्यांसह दिव्यांग पती बचावला
ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला कारने जोरदार धडक दिल्याने देवगड फणसगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या रा. ओरोस वर्दे रोडवर राहणाऱ्या मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार (वय २७) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मोपेड चालक शशांक प्रकाश पवार (वय ४०), त्यांचे चार महिन्यांचे बाळ पवित्रा व साडेतीन वर्षांचा प्रभास हे सुदैवाने बचावले. हा अपघात सोमवारी (दि.४) झाला.
घटनास्थळी त्वरित ओरोस पोलिस, महामार्ग पोलिस आणि कसालचे सरपंच राजन परब पोहोचले. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी कार (एमपी ०९ - झेडवाय ६९७५)ने कणकवलीकडे जाणाऱ्या शशांक पवार यांच्या (एमएच ०७ - एव्ही १२२९) दिव्यांगासाठीच्या चारचाकी मोपेडला महामार्गावर विरोधी दिशेच्या दुसऱ्या लेनवर जाण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत मोपेडवर मागे बसलेली शमिका पवार रस्त्यावर जोराने आदळली. त्यांना मेंदूमध्ये गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मोपेडस्वार शशांक पवार आणि त्यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षांचा मुलगा प्रभास सुदैवाने वाचले.
या प्रकरणी कार चालक राहुल शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश गवस, पोलिस कर्मचारी नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब तसेच ओरोस पोलिस ठाण्याचे हवालदार भुतेलो व गोसावी यांची टीम घटनास्थळी उपस्थित होती. नागरिकांनीदेखील मदतकार्य केले.
- मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल येथील दुर्घटनेत मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
- मोपेड चालक शशांक पवार, त्यांचे चार महिन्याचे बाळ पवित्रा आणि तीन वर्षांचा मुलगा प्रभास हे गंभीर अपघातातून बचावले.