Sindhudurg-Local Body Election:..तर केसरकरांचे नाव वापरून मते का मागता, निलेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:53 IST2025-11-27T15:51:05+5:302025-11-27T15:53:13+5:30
म्हणूनच आता पैशाने सर्वांना विकत घेण्याची भाषा, सावंतवाडीतील जनता सुज्ञ

Sindhudurg-Local Body Election:..तर केसरकरांचे नाव वापरून मते का मागता, निलेश राणेंचा सवाल
सावंतवाडी : नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुती व्हावी यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आमदार दीपक केसरकर आग्रही होते. परंतु दुर्दैवाने युती झाली नाही. मात्र आता मते मिळवण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला जात आहे. सावंतवाडीतील जनता हे ओळखून आहे म्हणूनच आता पैशाने सर्वांना विकत घेण्याची भाषा केली आहे. सावध रहा असे आवाहन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी केले.
जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीत आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर, अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, केसरकर यांना फक्त गरजेपुरते वापरले जात आहे. आज केसरकर व राणे यांची नाव सांगून मते मागली जात आहेत. परंतु हे सर्व चुकीचे आहे. महायुती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु दुदैवाने ती झाली नाही. २१ तारखेला फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु सकारात्मक कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अखेर युती तुटली.
..तर आम्ही स्वतः बंदोबस्त करू
मालवण येथे घडलेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले, या ठिकाणी पैसे वाटून जर कोणी निवडणुका लढवत असतील तर ते चुकीचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण आल्यानंतर त्या ठिकाणी ते काहीतरी घेऊन आले, असा मला संशय वाटला होता. त्यामुळे आम्ही त्यावर पाळत ठेवली आणि केनवडेकर नावाच्या भाजपा अधिकाऱ्यांच्या घरात वीस ते पंचवीस लाखांची रोकड सापडली आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी आम्ही स्वतः जातीनिशी लक्ष घालणार आहोत. पोलिसांनी त्यावर आवर न घातल्यास आम्ही स्वतः बंदोबस्त करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
केसरकरांनी निलेश राणेंचे केलं कौतुक
आमदार निलेश राणे यांचे दीपक केसरकर यांनी कौतुक केले. राणे करत असलेले काम हे पक्षाच्या हिताचे असून पक्ष वाढीसाठी ते जोरदार मेहनत घेत आहेत. त्यामुळेच युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे केसरकर यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले.