सिंधुदुर्गातील वीजवाहिन्या भूमिगत करणार

By Admin | Updated: August 24, 2015 23:21 IST2015-08-24T23:19:01+5:302015-08-24T23:21:26+5:30

बावनकुळे यांची माहिती : ४६ कोटी रुपये मंजूर; घरगुती वीजजोडण्या गणेश चतुर्थीपूर्वी द्या

Underground electricity from Sindhudurg will go underground | सिंधुदुर्गातील वीजवाहिन्या भूमिगत करणार

सिंधुदुर्गातील वीजवाहिन्या भूमिगत करणार

सिंधुदुर्गनगरी : सन २०१७ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शहरी भागातील वीज वाहिन्या या अंडरग्राऊंड केल्या जाणार आहेत. त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन हजार घरगुती वीजजोडण्या गणेश चतुर्थीपूर्वी द्या. १४०० कृषिपंप जोडण्या, ६० औद्योगिक वापरांच्या जोडण्या व ३५० व्यावसायिक जोडण्या मार्च २०१६ पूर्वी पूर्ण करा, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
या आढावा बैठकीत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शाखा अभियंत्यांपर्यंत सर्वांचीच हजेरी घेत प्रलंबित कामांचा जाब विचारत अधिकाऱ्यांना विजेपेक्षाही जबर ‘शॉक’ दिला. जिल्ह्यातील वीज वितरणाचा कारभार सुधारा, अन्यथा निलंबनाला सामोरे जा, असा दमही ऊर्जामंत्र्यांनी भरला.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील महावितरण व महापारेषण (पान ८ वर)
संदर्भात सोमवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, आमदार विजय सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, वीज वितरणचे प्रकल्प संचालक प्रभाकर शिंदे, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता पी. बी. पाटील, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता गौरीशंकर बुराटे, माजी आमदार प्रमोद जठार, विविध लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, तक्रारदार, ग्राहक, वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी या शहरी भागात अंडरग्राऊंड विद्युतपुरवठा देण्याचे काम तातडीने पूर्ण करा. त्यासाठी ४६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना यावेळी दिल्या. कणकवली ते कुडाळ ही २२० के.व्ही. विद्युतलाईनचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करा. तसेच जिल्ह्यातील ८३ ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड असून, त्याठिकाणी जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदला व विद्युतपुरवठा नियमित व विनाखंडित द्या, असे आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.
बेरोजगार कंत्राटदार निर्माण करा
या जिल्ह्यात वीज कंपनीतील कामे मोठ्या कंत्राटदारांमुळे प्रलंबित राहतात. म्हणूनच आता बी. ई. झालेल्या बेरोजगार अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना १५ लाखांपर्यंतची कामे द्या व स्थानिक पातळीवर वीजपुरवठ्याची कामे पूर्ण करून घ्या. तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र स्थापन करून त्याची दुरुस्ती तेथेच करून घ्या, असे आदेशही त्यांनी दिले.
मच्छिमारी संस्थांना वीजदरात सूट
कोकण पट्ट्यातील मच्छिमारी संस्थांना मत्स्य व्यवसाय व कृषी व्यवसाय करण्यासाठी विजेचा दर हा पूर्वी १२ रुपये प्रति युनिट होता. मात्र, युती शासनाने यात आठ रुपयांची कपात करीत हा विजेचा दर प्रति युनिट चार रुपये करून मच्छिमारांना दिलासा दिला आहे.

Web Title: Underground electricity from Sindhudurg will go underground