sindhudurg: गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन कुडाळमध्ये उद्धवसेनेची तहसीलदार कार्यालयावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:39 IST2026-03-14T13:38:18+5:302026-03-14T13:39:52+5:30
दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

sindhudurg: गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन कुडाळमध्ये उद्धवसेनेची तहसीलदार कार्यालयावर धडक
कुडाळ : आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे देशभरात एलपीजी गॅस टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत, तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या गॅस वितरक केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेतही अनेक अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे शुक्रवारी उद्धवसेनेच्यावतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शिवसैनिकांनी रिकामे गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन तसेच जोरदार घोषणाबाजी करत कुडाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत गॅस टंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
गॅस सिलिंडर बुकिंगमधील ओटीपी प्रणालीत सुधारणा करावी, ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी असल्यास ऑफलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच कमर्शियल गॅस सिलिंडर पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर व गंगाराम सडवेलकर, बाळा कोरगावकर, मंदार शिरसाट, अतुल बंगे, राजू कविटकर, दीपश्री नेरूरकर, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.