Sindhudurg: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना २० वर्षे कारावास; पीडित राहिली होती गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:50 IST2026-01-24T17:50:13+5:302026-01-24T17:50:58+5:30
सुपारीच्या बागेत बोलावून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. कोणाला सांगितल्यास मारण्याची दिली होती धमकी

Sindhudurg: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना २० वर्षे कारावास; पीडित राहिली होती गर्भवती
ओरोस : सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आरोपी आदित्य उर्फ मंदार अजित परब (२४ रा. आरोस गावठाण सावंतवाडी) आणि किरण केशव परब (३० रा. न्हावेली, रेवटेवाडी सावंतवाडी) यांना दोषी ठरवून दोघांनाही २० वर्षे कारावास व प्रत्येकी २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हा गुन्हा सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत घडला असून यातील आरोपी आदित्य याने अल्पवयीन मुलीला एका सुपारीच्या बागेत बोलावून बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली होती. तर आरोपी किरण याने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.
त्यानंतर दोघांनी वारंवार अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला होता. यातून अल्पवयीन मुलगी १० महिन्यांची गर्भवती राहिली होती. त्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार आदित्य आणि किरण यांच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले
याप्रकरणी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता आणि साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत दोघांनाही २० वर्षे कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रंजना पाटील आणि गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.