Sindhudurg: ओव्हरटेकच्या नादात ट्रकला पाठिमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:37 IST2025-12-31T16:37:38+5:302025-12-31T16:37:59+5:30
मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ येथील अपघातात तरुण ठार

Sindhudurg: ओव्हरटेकच्या नादात ट्रकला पाठिमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात चिरेवाहू ट्रकला पाठिमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अमन गणी खतिब (२२, रा. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात हुंबरठ तिठा येथे आज, बुधवारी (दि.३१) सकाळच्या सुमारास झाला.
अमन खतिब हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरठ तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली. या धडकेत अमन याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य करत अमन याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, कुटुंबीय काही वेळानंतर उपजिल्हा रुग्णालय दाखल झाले. मात्र, अपघातात अमनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. अमन याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.